23 वर्षांनंतर फिडे विश्व कप बुद्धिबळ स्पर्धा हिंदुस्थानात! गोव्यात 30 ऑक्टोबरपासून बुद्धिबळाचा महासंग्राम

23 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जागतिक दर्जाच्या बुद्धिबळ स्पर्धेचा महामहोत्सव पुन्हा एकदा हिंदुस्थानात रंगणार आहे. फिडे विश्व कप बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन यंदा गोव्यात 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबरदरम्यान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी या स्पर्धेचे अधिकृत लोगो आणि थीम साँग लाँच करून स्पर्धेची घोषणा केली.

आयोजकांच्या माहितीनुसार या प्रतिष्ठत स्पर्धेच्या विजेत्याला ट्रॉफीसह 2026 च्या कँडिडेट्स टुर्नामेंटमधील तीन स्थाने मिळणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेला जागतिक स्तरावर अफाट महत्त्व प्राप्त झाले आहे.

या बुद्धिबळ महायुद्धात जागतिक विजेता डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराती, निहाल सरीन तसेच आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू अनीश गिरी, वेसली सो, विन्सेंट केमर, हॅन्स नीमन, नोदिरबेक अब्दुसत्तोरोव, इयान नेपोम्नियाश्ची आणि रिचर्ड रेपोर्ट आपली कौशल्य आजमावणार आहेत.

विशेष म्हणजे हिंदुस्थानची उगवती बुद्धिबळतारका दिव्या देशमुख हिला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे ओपन वर्गात खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे देशातील युवा खेळाडूंसाठी हा प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की,बुद्धिबळाचा विश्व कप 23 वर्षांनंतर हिंदुस्थानात होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मागील वेळेस 2002 मध्ये ही स्पर्धा हिंदुस्थानात पार पडली होती तेव्हा विश्वनाथन आनंद यांनी किताब जिंकून देशाचा गौरव वाढवला होता. यावेळीही हिंदुस्थान सर्वोत्तम आयोजन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.

गोव्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बुद्धिबळाचा हा जागतिक सोहळा रंगणार असल्याने देशभरातील खेळप्रेमींचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. अर्थातच बुद्धिबळाचा बोर्ड गोव्यात सजला आहे आता ‘चेकमेट’ची प्रतीक्षा!