मुंबईत कोकणचो दशावतार, दिवाळीच्या मुहूर्तावर खेळ सुरू

 >>देवेंद्र भगत<<

कोकणातील सिंधुदुर्गमधील जगप्रसिद्ध लोककला असलेला ‘दशावतार’ दिवाळीचा मुहूर्त साधत मुंबईत खेळ सुरू करण्यास सज्ज झाला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईतील विविध भागांत दशावतार प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असल्याने सिंधुदुर्गमधील अनेक दशावतारी पंपन्या मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी दिवाळीमध्ये पौराणिक कथांच्या थराराची मेजवानी मिळणार आहे.

कोकणामध्ये शेकडो वर्षांची परंपरा असलेला दशावतार कला प्रकार प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजच्या युगातही कलाकारांनी मोठय़ा हिमतीने टिकवून ठेवला आहे. त्यामुळे या कलेला खऱया अर्थाने राजाश्रय मिळण्याची गरज आहे. कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गातील गावाच्या जत्रांमध्ये हा खेळ म्हणजे रसिकांसाठी मोठी मेजवानीच असते. दशावताराला सिंधुदुर्गात दहीकाला असेही संबोधले जाते. मध्यरात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालणारा हा खेळ पाहण्यासाठी कोकणवासीय तासन्तास जागा अडवून बसलेले असतात. सिंधुदुर्गमधील आवळेगाव मंदिरामध्ये त्रिपुरारी पोर्णिमेच्या आधी येणाऱया एकादशीदिवशी खेळ सुरू होतात. त्यानंतर गावागावातील जत्रांमध्ये दशावतार साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून दशावताराला मुंबईतूनही मोठी मागणी येत आहे. मुंबईत दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेले हे खेळ मालवणी जत्रांचीही शोभा वाढवतात. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या कोकणवासीयांना मुंबईमध्येच आपल्या मुलखातील कलेचा आस्वाद घेता येत आहे.

असे आहे महत्त्व

कोकणातील दशावतार हा केवळ मनोरंजन नसून तो एक सांस्कृतिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक अस्मितेचा भाग आहे. हा पारंपरिक लोकनाटय़ प्रकार विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहे.

n ज्या ज्या वेळी पृथ्वीवर संकट आले त्यावेळी भगवान विष्णूने दहा अवतार धारण करून पृथ्वीलोकावरील संकट दूर केले, अशी यामागची कथा आहे. सिंधुदुर्ग-कोकणात दशावतार सादर करणाऱया शंभरहून अधिक पंपन्या आहेत.

n भारदस्त संवाद, सुरेल गीत, वैशिष्टय़पूर्ण नृत्य आणि मनाला भिडणारे नाटय़ अशी या दशावताराची वैशिष्टय़े आहेत. कोणतीही स्क्रिप्ट नसलेल्या या नाटय़ात कलाकार मोठय़ा हिमतीने नाटय़ फुलवतात. कलाकार स्वतःची रंगभूषा स्वतःच करतात.

सिंधुदुर्गची ओळख असणारा दशावतार हा खऱया अर्थाने पौराणिक आणि धार्मिक आस्थेने साजरा केला पाहिजे. मात्र कालानुरूप  दशावतारात आधुनिकतेप्रमाणे बदलही झालेले दिसतात. मात्र दशावताराने आपले पौराणिक महत्त्व जपूनच कला सादर केली पाहिजे.

– बाबली मेस्त्री, खानोलकर दशावतारी मंडळ, वेंगुर्ला