बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने घेतला पेट, 12 जणांचा मृत्यू

शुक्रवार (२४ ऑक्टोबर) हैदराबाद-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात झाला. कुर्नूल जिल्ह्यातील कल्लूर मंडळातील चिन्नाटेकपूर भागात एका बसला आग लागली. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, काही मिनिटांतच बस पूर्णपणे जळून खाक झाली. आग आता आटोक्यात आली असून, पीटीआयने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

सुरुवातीच्या माहितीनुसार, बेंगळुरू-हैदराबाद महामार्गावर कालेश्वरम ट्रॅव्हल्स बस एका मोटारसायकलला धडकली. यामुळे भीषण आग लागली. पोलिसांनी सांगितले की, या अपघाताच्या वेळी चालक आणि सहाय्यकासह एकूण ४२ जण बसमध्ये होते. आतापर्यंत १५ जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या बस अपघातात १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलिस अधीक्षक विक्रांत पाटील म्हणाले की, अपघातात १० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, “कर्नूल जिल्ह्यातील चिनेटकुर गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना. सरकार जखमी आणि प्रभावित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करेल.”