अफगाणिस्तानला दुहेरी झटका, झिम्बाब्वेने केलं धोबीपछाड आणि ICC ने सर्व संघाला ठोठावला दंड; तब्बल 12 वर्षांनी…

अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये एक सामन्याची कसोटी मालिका खेळली गेली. या सामन्यात अफगाणिस्तानचं पारडं सामना सुरू होण्यापूर्वी जड मानलं जात होतं. परंतू झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला जोरदार धप्पा दिला आणि एक डाव राखून 73 धावांनी सामन्यासह मालिका जिंकली. विशेष म्हणजे झिम्बाब्वेने तब्बल 12 वर्षांनी घरच्या मैदानावर कसोटी सामना जिंकला आहे. तसेच अफगाणिस्तानने सामन्यासह मालिका तर गमावलीच, पण आयसीसीनेही सर्व संघाला दंड ठोठावला आहे.

उभय संघांमध्ये हरारे स्पोर्ट क्लब मैदानामध्ये कसोटी सामना खेळला गेला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनीही कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत घातक गोलंदाजीचे प्रदर्शन केलं. त्यामुळे अफगाणिस्तानचा पहिला डाव 127 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले आणि पहिल्या डावात सर्वगडीबाद 359 धावा चोपून काढल्या. 232 धावांची भक्कम आघाडी झिम्बाब्वेने घेतली. ही आघाडी फोडून तगड आव्हान देण्याची संधी अफगाणिस्तानला होती. परंतू अफगाणिस्तानचा दुसरा डावही फक्त 159 धावांवर संपुष्टात आला आणि झिम्बाब्वेने एक डाव राखून 73 धावांनी सामना जिंकला. कर्णधार क्रेग एर्विनच्या नेतृत्वात तब्बल 12 वर्षांनी कसोटी सामना जिंकण्याचा आनंद झिम्बाब्वेने साजरा केला.

या सामन्यात ICC ने अफगाणिस्तानच्या सर्व खेळाडूंना दंड ठोठावला आहे. निर्धारित वेळेपेक्षा 5 षटके कमी टाकली म्हणून सर्व खेळाडूंना सामना शुल्काच्या 25 टक्के इतका दंड ठोठावण्यात आला आहे. सामना पंच रिची रिचर्डसन यांनी लावलेला दंड ICC ने स्वीकारला असून अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने दंड स्वीकारला आहे.