
>>संजय कऱ्हाडे
सिडनीला आज होत आहे वन डे मालिकेचा तिसरा अन् शेवटचा सामना. मोठं विचित्र समीकरण असणार आहे. जिंकलो तर काहीच फरक पडणार नाही. मालिका तर आधीच गमावलेली आहे. म्हणजे बैल गेल्यावर झोपा करण्यासारखं ते ठरेल! सामना आपण हरलो तर तीन-शून्य अशी नामुष्की. असो. चला, काही सकारात्मक शक्यता पडताळून पाहू.
वन डे कप्तान म्हणून पहिल्या वन डे मालिकेतला एक तरी सामना जिंकण्याचा इरादा गिलला प्रोत्साहन देऊ शकतो. त्यासाठी त्याला स्वतःचं उदाहरण वैयक्तिक धावांसह इतरांसमोर ठेवावं लागेल. ‘आगौ’ 2027 च्या विश्वचषकासाठी कप्तानपदी त्याची निवड करतील, पण त्याच्या स्वतःच्या धावाच त्याला कर्णधारपदी मजबूत करू शकतात हे त्याने विसरता कामा नये! म्हणूनच ‘रो-को’च्या अनुषंगाने उठत असलेला गदारोळ आणि राजकारण त्याला कुलूपबंद करावं लागेल. कुणाला आवडो की नावडो, आजच्या सामन्यादरम्यान ‘रो-को’चा सल्ला त्याने मैदानावरच घ्यावा. हौद से गयी हुई इज्जत बूंद से आली तरी चालेल की! त्याचप्रमणे शुभमनने संघामध्ये काही खेळाडू हट्टाने निवडावेत.
ऍडलेडला बाजूच्या सीमारेषा जवळ होत्या म्हणून सामना जिंकून देऊ शकणाऱ्या कुलदीपची निवड झाली नव्हती. त्याच्याकडून धावा लुटल्या जातील ही शंका ‘आगौ’ला होती, मात्र त्याच ऍडलेडला झाम्पाने काय केलं हे शुभमन नक्कीच विसरला नसेल. कुलदीपसाठी त्याने हातपाय आपटून हट्ट करायला हवा. मैदानावर असताना तो अधूनमधून विरक्त वाटतो. मैदानावरचा त्याचा सहभाग अधिक ठणकेबाज दिसणं जरुरी आहे. राहुलऐवजी जुरेलला संधी देणं चुकीचं नसावं. राहुल बुजुर्ग खेळाडू आहे. संघाचा तारणहार बनून धावाही करतो. पण सहाव्या क्रमांकावर राहुलपेक्षा जुरेल जास्त उपयोगी ठरू शकेल. सिडनीचं मैदान खूप मोठं आहे. तसंच फलंदाजीसाठी खेळपट्टी शानदार असल्याचा गवगवा आहे.
‘आगौ’ने मात्र राणाचा जप आणि पर्यायाने आमचा तळतळाट टाळणं योग्य होईल. आठव्या क्रमांकावर नितीशऐवजी प्रसिद्धसारखा पूर्ण गोलंदाज खेळावावा असंही वाटतं.
आतापर्यंतची हिंदुस्थानची कामगिरी पाहता शुभमन, रोहित, कोहली, श्रेयस, अक्षर, जुरेल, सिराज, अर्शदीप, प्रसिद्ध, वॉशिंग्टन आणि कुलदीप असा प्रयोग करण्यास हरकत नसावी. यापेक्षा वेगळा संघ आपण खेळवून पाहिलाय. परिणामी त्याचा निकालसुद्धा बघितलाय.
विश्वचषकासाठी अजून दोन वर्षे आहेत. काही प्रयोग कधीतरी करून पाहावे लागणारच आहेत. सुरुवात आजपासून करा. आमची नजर मात्र ‘रो-को’वर कायम राहील.


























































