
हिंदुस्थानविरुद्धची एकदिवसीय मालिकेची मोहिम फत्ते केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आता टी-20 मालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुईस आणि वेगवान गोलंदाज माहली बियर्डमन यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघात बदल करण्याबाबतचे वृत्त दिले आहे. हिंदुस्थानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यातून मार्नस लाबुशेनला वगळण्यात आले आहे. लाबुशेन हा मंगळवारपासून गॅबा येथे सुरू होणाऱ्या क्वीन्सलॅण्डच्या शेफिल्ड शील्ड एनएसडब्ल्यूविरुद्धच्या सामन्याची तयारी करणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात जॅक एडवर्ड्सला स्थान देण्यात आले आहे.
हिंदुस्थानविरुद्धच्या टी-20 मालिकेला 29 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे, मात्र या मालिकेसाठी जोश हेझलवूड आणि शॉन ऍबॉट उपलब्ध नसतील. ते दोघे 10 नोव्हेंबरपासून एससीजी येथे सुरू होणाऱ्या व्हिक्टोरियाच्या शेफिल्ड शील्ड एनएसडब्ल्यूविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहेत. हेझलवूड फक्त पहिले दोन टी-20 सामने खेळेल.
मॅक्सवेल गेल्या महिन्याच्या अखेरीस नेट प्रॅक्टिसदरम्यान त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने शेवटच्या तीन टी-20 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात परतेल. ड्वारशुईसला पायाच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका आणि तीन टी-20 सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले होते, परंतु क्वीन्सलॅण्डमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या टी-20 सामन्यांसाठी त्याला संघात समाविष्ट करण्यात आले आहे.
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ ः मिशेल मार्श (कर्णधार), शॉन ऍबॉट (पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध), झेवियर बार्टलेट, माहली बिअर्डमन (शेवटच्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध), टीम डेव्हिड, बेन द्वारशिव (शेवटच्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध), नॅथन एलिस, जोश हेझलवूड (पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध), ट्रव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल (शेवटच्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध), जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनमन, जोश फिलिप (यष्टिरक्षक), मिशेल ओव्हन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस आणि ऍडम झम्पा.
































































