इलॉन मस्कची ‘स्टारलिंक’ हिंदुस्थानासाठी तयार, मुंबईसह नऊ शहरात इंटरनेटचे नवे नेटवर्क

हिंदुस्थानात इंटरनेटच्या जगात एक नवीन क्रांती होणार आहे. इलॉन मस्कची सॅटेलाइट इंटरनेट कंपनी ‘स्टारलिंक’ आता हिंदुस्थानात लाँच होण्याच्या तयारीत आहे. ‘स्टारलिंक’ कंपनी मुंबई, नोएडा, चंदिगड, हैदराबाद, कोलकाता आणि लखनऊसारख्या प्रमुख शहरांसह देशभरात नऊ ग्राऊंड स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. या स्टेशनच्या माध्यमातून हिंदुस्थानात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू होईल. स्टारलिंक हिंदुस्थानात आपली सेवा 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातील करू शकते. कंपनीला अद्याप काही आवश्यक परवानग्या मिळणे बाकी आहे.

600 गिगाबिट स्पीड क्षमता आणि चाचण्या

स्टारलिंकने हिंदुस्थानात प्रति सेकंद 600 गिगाबिट क्षमतेसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार विभागाने सध्या सुरक्षा मानकांची पडताळणी करण्यासाठी प्रात्यक्षिक उद्देशाने कंपनीला तात्पुरते स्पेक्ट्रम दिले आहे, जेणेकरून यंत्रणेची तपासणी करता येईल आणि सर्व काही नियमांनुसार होतंय की नाही, याची पाहणी करता येईल.

कडक सुरक्षा नियम आणि देखरेख

कोणताही गैरवापर रोखण्यासाठी सरकारने स्टारलिंकवर कठोर अटी लादल्या आहेत. कंपनीने त्यांचे स्टेशन चालवण्यासाठी परदेशी तांत्रिक तज्ञ आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु सरकारने हे स्पष्ट केले आहे की, गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळेपर्यंत केवळ हिंदुस्थानातील नागरिकच ही स्टेशन चालवू शकतील. 100 सॅटेलाईट टर्मिनल केवळ परीक्षणाच्या उद्देशाने आयात करण्याची अनुमती दिलेली आहे.