
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा कसा बोजवारा उडाला आहे. राज्यात अनागोंदी माजली असून पोलीस आणि कायद्याचे भय नष्ट झाले आहे. गृहखातेही अजगराप्रमाणे निपचित पडले असून नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रामध्ये पोलीस व्यवस्था आणि कायद्याचा बोजवारा उडाला आहे. कायद्याविषयीचे भय कसे नष्ट झाले असून अनागोंदी माजली हे स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आल्यापासून त्यांचे लक्ष गृहखाते, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याकडे नसून पूर्ण राजकारण आणि तेही विरोधी पक्षाच्या विरोधात काय कारणास्थाने करता येईल आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर करता येईल यात त्यांनी संपूर्ण पोलीस खाते अडकून ठेवले.
काल महाराष्ट्रात दोन गंभीर आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना घडल्या. फलटणमध्ये सरकारी रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिला आत्महत्या करावी लागली, आत्महत्येस प्रवृत्त केले आणि ते करणारे गुन्हेगार पोलीस खात्यातील आहे. दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली. एका मुलीवर सपासप वार करून तिची हत्या केली आणि हल्लेखोराने आत्महत्या केली. अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सातत्याने घडताना दिसत आहेत. अत्यंत असंवेदनशील पद्धतीने गृहखात्याचा कारभार सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, गृहखाते काय करतंय, तर विरोधकांवर पाळत ठेवतंय, फोन टॅप करतंय आणि पोलिसांना विरोधकांच्या मागे लावतंय. पोलिसांची जी व्यवस्था आहे ती या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी आहे. पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीने त्यांना राबवले जात असेल तर फलटण आणि मुंबई सारख्या दुर्घटना सतत घडत राहतील. घटना घडल्यावर चौकशीचे, निलंबनाचे आणि कठोर कारवाईचे आदेश दिले. पण या आधीच्या साडे तीन चार वर्षातील घटनांचे काय झाले, कुठपर्यंत आलात याविषयी तपशील मागितला तर शून्य आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदी एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने मुदतवाढ देत आहेत. त्या कार्यक्षम असाव्यात असे त्यांना वाटते, तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांचे खून, आत्महत्या होत आहेत. आता भाजपमधील सगळ्या महान महिला नेत्या कुठे गेल्या? हे इतर कुणाचे सरकार असते तर या महिलांवरील हल्ले, खून, अत्याचार विरोधात सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वाने, आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असता. आता या गप्प का आहेत? कसली वाट पाहत आहेत? असा सवाल करत राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे चित्र अत्यंत गंभीर आहे. सरकार सरकारसारखे काम करत नाही. सरकारची प्रशासनावर पकड नाही. गृहखाते अजगराप्रमाणे निपचित पडलेले असून राज्यातील महिला, तरुण, वृद्ध यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.



























































