
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच जिल्ह्यात महायुतीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने जिल्हा परिषदेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला असून यामध्ये स्वतःला म्हणजेच भाजपला २४, शिंदे गट २४ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ११ जागा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र अजित पवार गटाने भाजपच्या जागा वाटपाचा हा प्रस्ताव केराच्या टोपलीत टाकला असून २० जागा न दिल्यास युती शक्य नसल्याचा इशारा दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा लवकरच बार उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान जागा वाटपावरून महायुतीत वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते स्वबळावर निवडणुकीला सज्ज होत आहेत. मांडलेल्या प्रस्तावात प्रत्येक आमदाराला ८ जागांच्या प्रमाणात वाटप करण्याचे सूत्र मांडले गेले आहे.
यावेळी अन्याय सहन करणार नाही
भाजपने प्रस्ताव दिल्यानंतर अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची सुतारवाडीत बैठक झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, राजीव साबळे उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या फॉम्युल्यावर नाराजी व्यक्त करत ठाम भूमिका मांडल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात सुनिल तटकरे खासदार तर अदिती तटकरे या आमदार आणि मंत्री असल्याने पक्षाचे मोठे बळ आहे. त्यामुळे यावेळी अन्याय सहन केला जाणार नाही. समान वाटा म्हणून किमान २० जागा मिळाल्याशिवाय युती शक्य नाही, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटाला वादाचा फटका बसणार
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये नेहमीच शाब्दिक चकमक उडते. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांनी अनेकदा खासदार सुनील तटकरे व त्यांची कन्या मंत्री आदिती तटकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. त्यामुळे जागा वाटपाचे सूत्र जरी ठरले तरी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या उमेदवारांची कामे कितपत करतील याविषयी शंका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.




























































