
महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे पुराव्यानिशी समोर येऊनही मतदार याद्या निर्दोषच असल्याचा दावा आयोगाकडून होत आहे. आयोगाच्या या मनमानी, भ्रष्ट कारभाराविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी 1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडी आणि मनसेने या विराट मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी एकमताने घेतला आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या फोर्ट येथील कार्यालयात शनिवार डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यव्यापी प्रचार मोहीम राबवून या मोर्चात, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मतदार याद्यातील दुबार नावे, इतर ठिकाणची घुसडलेली नावे, अस्तित्वात नसलेले आणि अपूर्ण पत्ते, वय आणि लिंगातील तफावती, मतदार यादीत फोटो नसणे तसेच मागील वर्षभरापासून वयाची 10 वर्षं पूर्ण करणाऱ्या तरुणांना सरसकट मताधिकार नाकारणे या आणि अशाप्रकारच्या अनेक दोषांनी सदोष झालेल्या मतदार याद्यांचा वापर करून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे म्हणजे लोकशाहीची घोर थट्टा आहे. संविधानाने दिलेल्या अमूल्य अशा मताधिकारावर दिवसा उजेडी घातलेला दरोडा आहे. राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी निवडणूक यंत्रणांना हाताशी धरून ही निवडणूक एकतर्फी करण्याचा कट आखला आहे आणि म्हणूनच मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक नको, ही भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या मोर्चाच्या तयारीकरीता राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
डाव्या पक्षांच्या या बैठकीला भाई जयंत पाटील, भाई प्रा. एस. व्ही. जाधव आणि भाई ॲड. राजेंद्र कोरडे (शेतकरी कामगार पक्ष), कॉ. शैलेंद्र कांबळे (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), कॉ. प्रकाश रेड्डी (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), कॉ. किशोर ढमाले (सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष), कॉ.श्याम गोहिल आणि कॉ. दत्तू अत्याळकर (CPI -ML, लिबरेशन), कॉ. किशोर कर्डक (फॉरवर्ड ब्लॉक) हे डाव्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कॉ. डॉ. भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल) आणि इतर अनेक डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांनी या भूमिकेला पाठिंबा दर्शवून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती दिली.
1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा, निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात लढा
























































