
आशियाई ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 मध्ये हिंदुस्थानने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना इतिहास रचला आहे. 17 आणि 15 वर्षांखालील स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली. यापूर्वी 2013 मध्ये दोन सुवर्ण जिंकता आली होती. शायना मणिमुथू आणि दीक्षा सुधाकर यांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली.
15 वर्षांखालील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात शायना हिने जपानच्या चिहारू तोमिता हिचा 21-14, 22-20 असा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले, तर 17 वर्षांखालील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दीक्षा हिने लक्ष्य राजेश हिच्यावर 21-16, 21-9 अशा फरकाने मात केली. याआधी जगशेर सिंग खंगुराने पुरुष एकेरीत आणि जंगजीत सिंग काजला-जनानिका रमेश या जोडीने मिश्र दुहेरीत कांस्य पदक जिंकले. दरम्यान, आशियाई ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या इतिहासात 17 वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवणारी दीक्षा ही हिंदुस्थानची पहिली खेळाडू ठरली आहे.
पदक विजेते हिंदुस्थानी
- दीक्षा सुधाकर (अंडर-17) ः सुवर्ण
- शायना मणिमुथू (अंडर-15) ः सुवर्ण
- लक्ष्य राजेश (अंडर-17) ः रौप्य
- जगशेर सिंग खंगुरा (अंडर-17) ः कांस्य
- जगजीत सिंग काजला-जनानिका रमेश (अंडर-17) ः कांस्य
























































