1 नोव्हेंबरच्या विराट मोर्चाची जय्यत तयारी, निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वपक्षीय धडक; समन्वयासाठी नेत्यांच्या बैठका, भेटीगाठी, पक्ष पातळीवरही कार्यकर्त्यांशी चर्चा

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचे निदर्शनास आणूनही ढिम्म बसून राहिलेल्या निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढला जाणार आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी काढण्यात येणारा तो मोर्चा अभूतपूर्व ठरणार असून त्यासाठी विरोधी पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. मोर्चात समन्वय चांगला रहावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका आणि गाठीभेटी सुरू आहेत. तसेच पक्ष पातळीवरही नेते मंडळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून मोर्चाबाबत सूचना देत आहेत.

मतदार याद्या सदोष असल्याने आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी याद्यांमधील दोष दूर करावेत अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दोन वेळा मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार याद्यांमधील दोष दाखवून दिले होते. त्यानंतरही आयोगाने याद्यांमध्ये सुधारणेसाठी काहीच कारवाई न केल्यामुळे विरोधी पक्षांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, मनसे आणि डावे पक्ष हा मोर्चा भव्य आणि विराट होईल यादृष्टीने तयारी करत आहेत.

डाव्या पक्षांची बैठक

1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत फोर्ट येथील शेकाप कार्यालयात झालेल्या बैठकीला जयंत पाटील यांच्यासह प्रा. एस.व्ही. जाधव आणि अॅड. राजेंद्र कोरडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड किशोर ढमाले, सीपीआय-एमएल लिबरेशन पक्षाचे कॉम्रेड श्याम गोहिल आणि कॉम्रेड दत्तू अत्याळकर, फॉरवर्ड ब्लॉकचे कॉम्रेड किशोर कर्डक आदी उपस्थित होते. श्रमिक मुक्ती दलाचे कॉम्रेड डॉ. भारत पाटणकर आणि इतर डाव्या पुरोगामी पक्ष संघटनांनीही मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी होणार असल्याचे कळवले आहे.

सत्याचा मोर्चा

शिवसेनेने 1 नोव्हेंबरच्या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे म्हटले आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी त्यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘‘ही सत्तेची लढाई नाही, सत्याची लढाई आहे. ही खऱया मतदारांची लढाई आहे, खोटय़ा मतदारांची नाही. संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही जगवण्यासाठी खोटय़ा मतदार यादीविरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱया मतदारांनी सामील व्हावे,’’ असे आवाहन त्यात करण्यात आले आहे.

डावे पक्ष पूर्ण ताकदीनिशी मोर्चात उतरणार

डाव्या पक्षांनी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शेकापच्या फोर्ट येथील कार्यालयात जयंत पाटील यांच्या उपस्थितीत डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मोठय़ा संख्येने मोर्चात उतरण्याबरोबरच सदोष मतदार याद्यांबाबत जनजागृतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबवण्यावरही या बैठकीत एकमत झाले. सदोष यादी वापरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतर्फी करण्याचा कट सत्ताधाऱयांनी आखल्याचा आरोप नेत्यांनी केला.