
टीम इंडियाने ‘करो या मरो’च्या लढतीत बलाढ्य न्यूझीलंडचा फडशा पाडत सेमी फायनलमध्ये धडक मारली. या सामन्यात स्मृती मानधना आणि प्रतिका रावलने खणखणीत शतके ठोकली आणि पहिल्या विकेटसाठी विक्रमी 212 धावांची भागीदारी केली. स्मृतीसह प्रतिका रावलची अशीच धडाकेबाज फलंदाजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमी फायनलमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र, सेमी फायनलपूर्वीच प्रतिकाच्या रुपात टीम इंडियाला मोठा हादरा बसला आहे. दुखापतीमुळे प्रतिकाला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं आहे.
टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये 26 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर सामना खेळला गेला. . या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू पकडताना प्रतिकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ सहकाऱ्यांच्या मदतीने मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं. त्यानंतर मात्र, प्रतिका पुन्हा मैदानामध्ये येऊ शकली नाही. तसेच पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुद्धा पूर्ण होऊ शकला नाही. बांगलादेशने 27 षटकांमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 119 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 8.4 षटकांमध्ये बिनबाद 57 धावा केल्या. पावसाच्याने व्यत्ययामुळे सामना होऊ शकला नाही.
स्मृती आणि प्रतिका या जोडीने टीम इंडियाला अनेक सामन्यांमध्ये विस्फोटक सुरुवात करून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना या दोघींच्या फटकेबाजीमुळे चर्चेता आला. तसेच टीम इंडियाला 300 पार घेऊन जाण्यास या दोघींचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. प्रतिकाने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली फलंदाजी करत 308 धावा केल्या आहे. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत प्रतिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर स्मृती मानधना असून तिने आतापर्यंत 365 धावा केल्या आहेत. त्यामुळे 29 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सेमी फायनलच्या सामन्यात प्रतिकाची कमतरता टीम इंडियाला जाणवणार हे नक्की.


























































