
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज देशव्यापी मतदार यादी फेरछाननीची (एसआयआर) घोषणा केली. त्यानुसार, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशासह 12 राज्यांत 28 ऑक्टोबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, अंदमान-निकोबार, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांसह 12 राज्यांत मतदार फेरछाननी होईल.
बिहारमध्ये झालेली मतदार यादी फेरछाननी हा देशव्यापी एसआयआरचा पहिला टप्पा होता. हा दुसरा टप्पा असेल. ही संपूर्ण प्रक्रिया 7 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, असे ज्ञानेशकुमार यांनी सांगितले.
अशी असेल प्रक्रिया…
- 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर ः प्रशिक्षण
- 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर ः घरोघरी जाऊन मतदार गणना
- 8 डिसेंबर ः प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध होणार
- 9 डिसें. ते 8 जाने. ः सूचना व हरकती कालावधी
- 9 डिसेंबर ते 31 जाने. ः सुनावणी व पडताळणी
- 7 फेब्रुवारी ः अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
ही कागदपत्रे चालणार
- नोकरीच्या ठिकाणी मिळालेले कोणत्याही स्वरूपातील ओळखपत्र/पेन्शन पेमेंट ऑर्डर
- हिंदुस्थान सरकार, बँका, पोस्ट ऑफिस, एलआयसी किंवा सरकारी पंपनीचे आयकार्ड, प्रमाणपत्र किंवा कागदपत्र
- जन्माचा दाखला
- पासपोर्ट
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- निवासाचा कायमस्वरूपी पत्ता
- वनहक्क प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- एनआरसी (अस्तित्वात असल्यास)
- फॅमिली रजिस्टर
- जमीन किंवा घर
वितरण प्रमाणपत्र
आधार (फक्त ओळखीचा पुरावा म्हणून)
महाराष्ट्राला वगळले!
महाराष्ट्रात मतदार यादीत अनेक घोळ असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी मतदार यादीची फेरछाननी व्हावी अशी मागणी सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र, देशव्यापी एसआयआरच्या दुसऱया टप्प्यातून महाराष्ट्राला वगळण्यात आले आहे. केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असूनही तिथे एसआयआर होणार आहे. याबाबत विचारले असता, तिथे अद्याप अधिसूचना काढण्यात आलेली नाही, असे उत्तर ज्ञानेश कुमार यांनी दिले.
- कोणत्या राज्यांत होणार… मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामीळनाडू, गुजरात, केरळ, गोवा, छत्तीसगड, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, पुद्दुचेरी.




























































