
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावच्या घरी चोरी झाल्याचे समोर आले आहे. खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथील घरी राहत असल्याने जळगावचे घर बंद होते. त्या घराचे कुलुप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला व चोरी केली. चोरांनी बंगल्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याचे समोर आले आहे.
बंगल्यातील चोरीबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर निशाणा साधला. ”पोलिसांचा जळगाव जिल्ह्यावर धाक राहिलेला नाही. चोऱ्या दरोडेखोरांनी उन्माद केले आहे. पोलीस हफ्ते घेण्यात मश्गूल आहेत. पोलिसांवर टीका केली की स्थानिक आमदार माझीच टिंगलटवाळी करतात. कुणालाही कसलंच गांभिर्य राहिलेलं नाही”, असे एकनाथ खडसे यांनी सांगितली.
रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा मुक्ताईनगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी रक्षा ऑटो फ्युअल या नावाने पेट्रोल पंप आहे. 10 ऑक्टोबरच्या रात्री दोन दुचाकींवरून पाच जण पेट्रोल पंपावर आले. दरोडेखोरांनी दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लाऊन पेट्रोल पंपावरील सुमारे एक लाख रूपयांची रोकड लांबविली.

























































