स्वागत दिवाळी अंकांचे

चंद्रकांत

नेहमी ज्या दिवाळी अंकांची आतुरतेने वाट पाहिली जाते त्यात ‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकाचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कथा, कादंबरी यांना वाहिलेला अंक ही ‘चंद्रकांत’ अंकाची ओळख. याही वर्षी पाच कांदबऱ्या देत कादंबऱयांचे मुक्तपीठ हे बिरूद या अंकाने सार्थ केले आहे. अनंत सामंत, माधुरी तळवलकर, उमेश कदम, पु. रा. रामदासी व दिवाकर नेमाडे या मान्यवर लेखकांच्या कादंबऱया हे वाचकांसाठी मेजवानी ठरणारी आहे. तसेच सोबत वैशिष्टय़पूर्ण असे लेखही आहेत. दीपा मंडलिक यांचा ‘वैदिक देवता ते अष्टक्पाल’, मं. गो. राजाध्यक्ष यांचा ‘लोकशाहीचा पूजक’
– बॅरिस्टर नाथ पै यांच्यावरील लेख व इतरही लेख वाचनीय आहेत.

संपादिका ः नीलिमा कुलकर्णी पृष्ठ ः 256, मूल्य ः 400 रुपये

मुक्तछंद

दरवर्षीप्रमाणे यंदाही दैनिक ‘रामप्रहर’चा ‘मुक्तछंद’ दिवाळी अंक बहारदार आहे. अंकाच्या लेख विभागात सायराबानू चौधुले यांचा ‘मराठीचे भवितव्य ः आपली जबाबदारी’, सुवर्णा साधू यांचा ‘बदलते जग’, माधव शिरवळकर यांचा ‘एआय नावाचा सिनेमा’, समीक्षा चव्हाण यांचा ‘रोजंदारीवर जगणाऱया महिला संघर्ष भाकरीचा’, इक्बाल शर्फ मुकादम यांचा ‘बूट पॉलिश’, ए. के. शेख यांचा ‘गोष्ट गजलची’, रेश्मा धुमाळ यांचा ‘कचरा व्यवस्थापन- काळाची गरज’ अशा विविध विषयांनी लेख विभाग सजलेला आहे. अंकातील कथाविष्कार विभागात ज्ञानेश्वर घरत, शैलजा करोडे, पी.ए. आत्तार, ऋता भामरे, लतिका गांगल, लतिका गांगल, रमेश भोळे, अनिकेत गायकवाड आणि अ‍ॅड.माधुरी थळकर यांच्या कथा अत्यंत वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत. संजय मिस्त्री यांची व्यंगचित्रे आहेत.

संपादक ः देवदास मटाले पृष्ठ ः 152, मूल्य ः 100 रुपये

क्षात्रसेतू

मुंबई-पालघरमध्ये मोठय़ा संख्येने असलेला वाडवळ समाज आणि सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचा ‘क्षात्रसेतू’ हा दिवाळी अंक विविधांगी लेख, कवितांनी खच्चून भरलेला आहे. मुखपृष्ठावरील जुने कौलारू घर, आजूबाजूला माड, पोफळी आणि झाडेझुडपे पालघर तालुक्यातील संस्कृतीचे दर्शन घडवतात. ‘उत्तर कोकणातील वाडवळ समाज’ या लेखात हरिश्चंद्र चौधरी यांनी सोमवंशी क्षत्रिय (पाचकळशी) आणि सोमवंशी पाठारे क्षत्रिय (चौकळशी) असे पोटभेद दाखवून समाजाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर ललित साहित्यासह वाडवळ समाज बांधवांचे वैचारिक, धार्मिक लेख, विशेषकरून महिलांनी लिहिलेले लेख लक्ष वेधून घेतात. केवळ ज्ञाती बांधवांसाठी हा अंक असल्यामुळे याला मर्यादा येतात. मात्र, अंकातील वैचारिक मजकूर आणि साहित्य या मर्यादा ओलांडतात.

संपादक ः नरेश राऊत पृष्ठ ः 94, मूल्य ः 50 रुपये

कुळवाडी

‘कुळवाडी’ दिवाळी अंकाचे हे पहिलेच वर्ष आहे. स्त्रियांचे जीवन, विविध क्षेत्रांतील त्यांचे योगदान, ऐतिहासिक काळातील स्त्रियांच्या जीवनातील परिवर्तन, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, समाजातील त्यांचे स्थान अशा विविधांगी मुद्दय़ांना स्पर्श करीत योजलेला हा स्त्री विशेषांक वाचनीय झाला आहे. स्त्री ला केंद्रवर्ती मानून महाराष्ट्रातील सर्जनशील आणि वैचारिक लेखकांच्या लेखनातून साकारलेला हा विशेषांक आहे. अंकात स्त्री जीवनाचा चिंतनशील वेध घेणाऱया डॉ. जनार्दन वाघमारे आणि अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांच्या मुलाखती आहेत. स्त्री संघर्षाची यशोगाथा मांडणाऱया विभागात ‘बाईमाणूस’-
लीला शिंदे, ‘स्त्री चळवळ कशासाठी?’- डॉ. गीताली वि. म. यांचे लेख महत्त्वाचे आहेत.

संपादक ः माधव जाधव पृष्ठ ः 208, मूल्य ः 340 रुपये