आजपासून टी-ट्वेंटीचा गजर!

>>संजय कऱ्हाडे

सुट्टी कुठलीही असो; शाळेची असो की कॉलेजची की ऑफिसची ज्या दिवशी संपते त्या दिवशी वाटतं, आजपासून सुरू झाली असती तर मज्जा आली असती! क्रिकेटचं तसं नसतं. एक मालिका संपली की दुसरी लगेच सुरू होते. अगदी आधीच्या मालिकेच्या चांगल्या-वाईट निकालावरचा ऊहापोह संपण्याआधीच!

ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका आपण पहिल्याच दोन सामन्यांनंतर हरलो. पण मालिकेतला तिसरा सामना आपण जिंकला आणि ‘रो-को’च्या यशाच्या गाथा आपण वाचू लागलो. ते बरोबरही होतंच. त्यांची फलंदाजीच तशी उच्च दर्जाची होती. मात्र दुसऱ्या वन डे सामन्यात अॅडलेडला हिंदुस्थानी संघाने जर थोडसं बरं क्षेत्ररक्षण केलं असतं, सोप्पे झेल सोडले नसते तर ही मालिका आपण जिंकू शकलो असतो यावर कुणी फारसं बोललं नाही!

यातून काय अर्थ काढायचा? देशाच्या पराभवापेक्षा वैयक्तिक कामगिरी आपल्यासाठी अधिक महत्त्वाची ठरते, की नकारात्मकता विस्मरणात टाकून फक्त सुशोभिताकडे पाहून पुढे जाण्याकडे आपला कल वाढलाय!

असो. तीन-चार दिवसांच्या विरहानंतर सुट्टी, सॉरी क्रिकेट पुन्हा सुरू होतंय. हा गजर असेल पाच टी-ट्वेंटी सामन्यांचा अन् साक्षात्कार होणार आहे सूर्यकुमार, अभिषेक, तिलक, सॅमसन, शुभमन, रिंकू, जितेशसारख्या ठोकबाज फलंदाजांचा. ताजातवाना बुमरासुद्धा आपल्याला दर्शन देणार आहे! त्याच्याभोवती पिंगा घालण्यासाठी अर्शदीप, राणा, दुबे, रेड्डी असतील अन् नेहमीचे फिरकीबाज अक्षर, वरुण, सुंदरही. अर्थात, कुलदीपचा समावेश मैदानावरच्या संघात होतो की बाकडय़ावर बसणाऱ्यांच्या संघात होतोय हे पाहण्यासाठी मी आतुर झालोय!

माझं विशेष लक्ष असेल ते मात्र अभिषेक आणि कप्तान सूर्यकुमारकडे. अभिषेकने त्याच्या जादुई फलंदाजीचा नज़ारा आशिया कप स्पर्धेत दाखवला. पण ऑस्ट्रेलियात त्याला वेगळय़ा खेळपट्टय़ा दिसतील. चेंडूला छान उसळी देणाऱ्या. बॅटवर येणारा चेंडू त्याला खूश करून जाईल. पण टी-ट्वेंटीच्या हाराकिरीतसुद्धा संयमाची आवश्यकता असते हे अभिषेकला तिथे शिकता येईल.

कप्तान सूर्याचा उदयसुद्धा टी-ट्वेंटी सामन्यांपासूनच झाला होता. अभिषेकचं आजचं यश सूर्यानेही पाहिलं, अनुभवलं आहे. सूर्याची प्रगती तर वन डे आणि कसोटी सामन्यापर्यंत झाली होती. पण संयमाविना सूर्याला प्रत्यक्षात वन डे आणि कसोटी खेळणं झेपलं नाही. यातून अभिषेकसाठी बरंच काही शिकण्यासारखं असेल.

सूर्याने गेल्या दहा टी–ट्वेंटी सामन्यांत जेमतेम शंभर धावा केल्यात! आशिया कप स्पर्धेच्या विजयातही त्याच्या बॅटने फार झोके घेतले नव्हते. ऑस्ट्रेलियात सूर्याची बॅट सुरेल गाणी म्हणेल अशी आशा!

शेवटी तिसऱ्या वन डे सामन्यात अकथनीय झेल घेताना बरगडी दुखावून घेतलेल्या श्रेयस अय्यरला शुभेच्छा. श्रेयस, लवकर बरा हो!