आजपासून टी-20 वर्ल्ड कपची रंगीत तालीम! हिंदुस्थान- ऑस्ट्रेलियादरम्यान रंगणार सलामीचा सामना

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या वन डे क्रिकेट मालिकेला फारसे महत्त्व नसले तरी बुधवारपासून (दि.29) पॅनबेरात सुरू होणारी पाच सामन्यांची टी-20 मालिका उभय संघांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कारण ही मालिका फेब्रुवारीत हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अगोदरची शेवटची मोठी रंगीत तालीम मानली जात आहे.

क्रिकेट विश्वातील दोन अव्वल संघांमध्ये लढत

सध्या हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर  असलेले संघ आहेत. ऑस्ट्रेलियातील परिस्थिती हिंदुस्थानी संघासाठी वेगळी असली तरी दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध खेळून आपली रणनीती आणि खेळशैली तपासण्याची ही मोठी संधी आहे. टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडिया सध्या जगातील सर्वात बलाढय़ संघ मानला जातो. विद्यमान जगज्जेता असलेल्या हिंदुस्थानी संघाने गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर आशिया कपमध्येही अपराजित राहून अजिंक्यपद पटकावले. 2024 च्या वर्ल्ड कपनंतर हिंदुस्थानने फक्त तीन टी-20 सामने गमावले आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघात अनेक तरुण आयपीएलफेम खेळाडूंची भर पडल्याने तो आणखी गतिमान झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा नवा आक्रमक अवतार

हिंदुस्थानकडून 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळशैलीत आमूलाग्र बदल केला. मिशेल मार्शच्या नेतृत्वाखालील या संघाने संकूर्ण आक्रमक शैली स्वीकारली असून गेल्या 20 टी-20 सामन्यांपैकी त्यांनी फक्त दोनच सामने गमावले आहेत. ट्रव्हिस हेड, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्पस स्टॉयनिस यांच्या फलंदाजीने संघाने नवा आत्मविश्वास मिळवला आहे, मात्र कॅमेरून ग्रीन अनुपस्थित असून स्टॉयनिस आणि मॅट शॉर्ट त्याची जागा घेतील. मुख्य प्रशिक्षक अॅण्ड्रय़ू मॅकडोनाल्ड म्हणाले, ‘आम्ही आमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक आक्रमक खेळलो आहोत आणि काही खेळाडूंना वेगवेगळय़ा स्थानावर आजमावले आहे. हा संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 मॅथ्यू कूनमन अन् सूर्यकुमार यादव

ऑस्ट्रेलियाच्या पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अॅडम झम्पा हे कायम पहिले नाव असते, पण पितृत्व रजेवर गेल्याने या मालिकेत तो खेळणार नाही. त्यामुळे मॅथ्यू कूनमनला आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी दोन फिरकीपटूंचा पर्याय टिकवून ठेवण्यासाठी त्याचे प्रदर्शन निर्णायक ठरू शकते. दुसरीकडे सूर्यकुमार यादवसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. 2024 मध्ये तो जगातील अव्वल टी-20 फलंदाज होता, पण गेल्या 14 डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक केलेले नाही. त्याची सरासरी केवळ 10.50 आणि स्ट्राईक रेट 100.80 एवढाच आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये उत्पृष्ट खेळ करूनही त्याचा आंतरराष्ट्रीय फॉर्म हरवणे चाहत्यांसाठी कोडे ठरले आहे. मात्र मी लवकरच लौकिकास साजेशी कामगिरी करेल, असा विश्वास सूर्यकुमारने व्यक्त केला.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, शिवम दुबे/हर्षित राणा, कुलदीप यादव/वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ मिशेल मार्श (कर्णधार), ट्रव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मिच ओवेन, मार्पस स्टॉयनिस, सीन अबॉट/झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅट कूनमन, जोश हेजलवूड.