
देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा करण्याची हमी दिली होती. अतिवृष्टीग्रस्तांना 18,500 रुपये दिवाळीपूर्वी मदत देणार म्हणून सांगितले होते. दिवाळी उलटून गेली तरी अजून खडकू मिळाला नाही. भाजपला मतदान करूनही आमचे हाल! काय चुकलं आमचं, असा संतप्त सवाल करीत परभणीत एका शेतकऱयाने जिल्हाधिकाऱयांची गाडी फोडली. मला गोळी घातली तरी चालेल, पण कर्जमाफी झाली पाहिजे, असेही त्याने ठणकावून सांगितले.
मदत न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱयाने काल नांदेड जिल्हय़ात तहसीलदाराची गाडी फोडली होती. त्यानंतर आज परभणीत त्याची पुनरावृत्ती झाली. दुपारी संतोष पैके या शेतकऱयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या शासकीय गाडीवर दगड घातला. पोलिसांनी पैके यांना लगेच ताब्यात घेतले. संतोष पैके हे पालममधील चाटोरी गावचे रहिवाशी आहेत.


































































