
पतीच्या अर्जावर निर्णय देत ठाणे कुटुंब न्यायालयाने मंजूर केलेला घटस्फोट उच्च न्यायालयाने रद्द केला. पतीने दुसरा विवाह केला आहे. त्यामुळे पतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने हा घटस्फोट रद्द केला. कुटुंब न्यायालयाने पत्नीचे म्हणणे न ऐकताच हा घटस्फोट मंजूर केला. त्यामुळे हा निर्णय रद्द केला जात आहे. कुटुंब न्यायालयाने यावर नव्याने निर्णय द्यावा, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
कारण दिले नाही
हा घटस्फोट का मंजूर केला जात आहे याचे कोणतेही कारण कुटुंब न्यायालयाने नमूद केले नाही. पत्नी सुनावणीला हजर नव्हती, असे सांगत हा घटस्फोट दिला गेला. हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांचे उल्लंघन आहे, असा ठपका खंडपीठाने ठेवला.
तथ्य तपासणे आवश्यक
पतीचा दावा अंतिम सत्य मानला जाऊ शकत नाही. त्यातील तथ्य कुटुंब न्यायालयाने तपासणे आवश्यक आहे. तसे न करताच घटस्फोट देणे अयोग्य आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले.
पत्नी त्रास द्यायची!
या जोडप्याचा विवाह 2017मध्ये झाला. पत्नी क्रूरपणे वागते. याचा नाहक त्रास होतो. घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी करत पतीने अर्ज केला. हा अर्ज कुटुंब न्यायालयाने मंजूर केला होता.






























































