दुनियादारी – बांगलादेशच्या राजकारणात पुनरागमन करणार, शेख हसीना यांचा निर्धार

गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर हिंदुस्थानात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजकारणात पुनरागमन करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. ‘सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात, पण माझी अवामी लीग पार्टी बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा जम बसवेल, असे त्यांनी म्हटले आहे.

‘प्रश्न माझा किंवा माझ्या कुटुंबाचा नाही, बांगलादेशच्या भवितव्याचा आहे. कोणीही एक व्यक्ती किंवा कुटुंब देशाचे भविष्य ठरवू शकत नाही. जेव्हा स्थिर आणि संविधानानुसार चालणारे सरकार असेल तेव्हाच बांगलादेशचे भविष्य उज्ज्वल असेल, असे हसीना म्हणाल्या. ‘स्वदेशात परतण्याची माझी इच्छा नक्कीच आहे. पण देशात कायदेशीर सरकार असेल आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चांगली असेल तेव्हाच ते शक्य होईल, असे त्या म्हणाल्या. अवामी लीग पार्टीला निवडणूक लढवू न दिल्यास आमचे कोटय़वधी पाठीराखे निवडणुकांवर बहिष्कार घालतील, असा इशाराही त्यांनी दिला.

तालिबानींना पुन्हा गुहेत पाठवू, पाकिस्तानची धमकी

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला धमकी दिली आहे. ‘आमची कुरापत काढाल तर तुम्हाला पुरते संपवून टाकू आणि पुन्हा गुहेत लपायला भाग पाडू. तालिबानला संपवण्यासाठी आमच्याकडे असलेल्या एकूण शस्त्रांच्या एक टक्का शस्त्रांचीही गरज लागणार नाही’, असे आसिफ यांनी म्हटले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली होती. यात दोन्हीकडचे अनेक सैनिक व नागरिकही मारले गेले. तुर्कीच्या मध्यस्थीने दोन्ही देशांनी तात्पुरती शस्त्रसंधी केली होती. कायमस्वरूपी शांततेसाठी इस्तंबूलमध्ये वाटाघाटी सुरू होत्या. मात्र ती निष्फळ ठरली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे.