पहिला सामना पावसाचा, सूर्यकुमारच्या चमकदार खेळीवर पाणी फेरलं!

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेलेला पहिला टी-20 सामना पूर्णपणे पावसाच्या ताब्यात गेला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण कॅनबेराच्या आभाळाने दोन्ही संघांच्या आशांवर अक्षरशः पाणी फेरले. पहिल्या पाच षटकांनंतर पावसाने खेळ थांबवला, पुन्हा सामना 18-18 षटकांचा ठेवत खेळ सुरू झाला, पण हिंदुस्थानने 9.4 षटकांत एक विकेट गमावून 97 धावा केल्यावर पुन्हा मुसळधार पाऊस आला आणि सामन्याचा शेवट पावसाने लावला.

सूर्यकुमार आणि गिलची झळाळी

हिंदुस्थानकडून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांनी दमदार फलंदाजी केली. अभिषेक शर्मा (19) बाद झाल्यानंतर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा सूर्यकुमार 24 चेंडूंवर 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावांवर, तर गिल 20 चेंडूंवर 4 चौकार आणि 1 षटकारासह 37 नाबाद धावांवर होता. त्यांच्या या झळाळत्या खेळीने हिंदुस्थानी डावाला वेग मिळाला होता, पण पावसाने ती लयच मोडली.

हवामान खात्याचा अंदाज फोल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कॅनबेरात फक्त 16 ते 20 टक्के पावसाची शक्यता होती, परंतु संध्याकाळच्या सुमारास आभाळ भरून आलं आणि मुसळधार पावसाने सामना दोनदा थांबवला. अखेरीस पंचांना खेळ रद्द करण्याशिवाय पर्यायच उरला नाही.

मार्शचा टॉस विक्रम कायम

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला 18 वा टॉस जिंकला. गंमत म्हणजे या सर्व सामन्यांत त्याने नेहमीच प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानविरुद्ध तो सलग चौथा टॉस जिंकला असून याआधीच्या वन डे मालिकेतही सर्व टॉस त्यानेच जिंकले होते.

बुमराचे पुनरागमन, अर्शदीपला विश्रांती

या सामन्यात हिंदुस्थानसाठी आनंदाची बातमी म्हणजे जसप्रीत बुमराचे पुनरागमन. मात्र अपेक्षेप्रमाणे अर्शदीप सिंहला स्थान मिळाले नाही. संघ दोन जलदगती गोलंदाजांसह म्हणजे बुमरा आणि हर्षितसह उतरला होत तर अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या तीन फिरकीवीरांनी आघाडी घेतली होती. संजू सॅमसनला पहिला विकेटकीपर म्हणून संधी मिळाला तर जितेश शर्मा आणि रिंकू सिंह प्रतीक्षेत राहिले. दुर्दैवाने गोलंदाजांना एकही चेंडू टाकण्याची संधी मिळाली नाही.

सूर्याचा फॉर्म आणि नवा विक्रम

कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी हा सामना आत्मविश्वास मिळवून देणारा ठरला. अलीकडच्या काळात तो फॉर्मसाठी झगडत होता, पण कॅनबेरात त्याच्या बॅटमधून पुन्हा चौकार-षटकारांचा वर्षाव झाला. या सामन्यात त्याने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार पूर्ण करणारा जगातील पाचवा आणि हिंदुस्थानचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी हे यश फक्त रोहित शर्मालाच मिळाले होते.