डोक्याला चेंडू लागल्याने 17 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू, हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान घडली दुर्दैवी घटना

हिंदुस्थान ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामन्यात पावसाने खोडा घातल्यामुळे सामना होऊ शकला नाही. दुसरा सामना 31 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ मालिकेतील पहिला विजय मिळवण्यासाठी कसून सराव करत आहेत. मात्र, याच दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये एक दु:खद घटना घडली आहे. 17 वर्षीय बेन ऑस्टिन या खेळाडूचा फलंदाजीचा सराव करत असताना चेंडू डोक्याच्या आणि मानेच्या मध्ये लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मेलबर्नमध्ये मंगळवारी बेन ऑस्टिन बॉलिंग मशीनच्या सहाय्याने फलंदाजीचा सराव करत होता. सराव करत असताना त्याने हेलमेट सुद्धा परिधान केले होते. मात्र, वेगाने आलेला चेंडू त्याच्या मानेच्या आणि डोक्याच्या मध्ये लागला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी (29 ऑक्टोबर 2025) त्याचा मृत्यू झाला. बेन हा संघाचा एक दर्जेदार गोलंदाज आणि फलंदाज होता. त्याच्याकडून आम्हाला भविष्यात खूप अपेक्षा होत्या, अशा भावना फर्नट्री गली क्रिकेट क्लबने व्यक्त केल्या.

बेन ऑस्टिनच्या मृत्यूमुळे 10 वर्षांपूर्वी फिलिप ह्यूजच्या मृत्यूची सर्वांना आठवण झाली. फिलीपचा मृत्यू सुद्धा चालू सामन्यात फलंदाजी करत असताना मानेला चेंडू लागल्याने झाला होता. आता पुन्हा एकदा बेन ऑस्टिनचा मृत्यू झाल्याने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा़ चर्चेता आला आहे.