
महिला डॉक्टर भगिनीच्या आत्महत्येला जे कोणी जबाबदार असेल त्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीडित कुटुंबाला दिलासा दिला. कायद्याची लढाई तर लढूच पण न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर लढावे लागले तरी शिवसेना तयार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज कवडगाव येथे महिला डॉक्टरच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी पीडित कुटुंबाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी पह्नवरून बोलणे करून दिले. फलटण पोलीस आणि सातारा पोलीस एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व भ्रष्ट यंत्रणेला सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप या वेळी नातलगांनी केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगार कोणीही असला तरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा दिलासा पीडित कुटुंबाला दिला. शिवसेना पीडित कुटुंबाच्या पाठीशी असून महिला डॉक्टर भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याची लढाई तर लढूच पण वेळ पडली तर रस्त्यावरची लढाईदेखील लढू, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी दिला.
एसआयटी चौकशीसाठी ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर
महिला डॉक्टरच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी आज कवडगाव येथील ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. या वेळी काही ग्रामस्थांनी टाकीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
चाकणकरांना जाब विचारणार – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महिला डॉक्टरच्या कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला. या वेळी पीडितेच्या कुटुंबाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त केला. त्यावर अजिद पवार यांनी आपण त्या भूमिकेशी सहमत नाही, याबद्दल चाकणकरांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.
 
             
		



































 
     
    






















