
बेस्ट बस क्रमांक सी-10 ची मार्गिका बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपो या जुन्या मार्गावर पूर्ववत चालवावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक, युवासेनेचे सहसचिव अॅड. मेराज शेख यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात बेस्टचे उप-मुख्य महाव्यवस्थापक प्रवीण शेट्टी यांना पत्र लिहिले आहे.
बॅकबे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक बेस्ट बस डेपोपर्यंतच्या क्षेत्रात रफी अहमद किडवाई मार्गावर वडाळा रेल्वे स्थानकापासून माटुंगा व शीवपर्यंत अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. याच मार्गात शीव रुग्णालय आहे. त्याचा संपूर्ण रफी अहमद किडवाई मार्ग परिसरातील नागरिकांना फायदा होतो. शिवडी, ज्ञानेश्वर नगर, किडवाई नगर, सहकार नगर, आझाद नगर येथील रहिवासी आणि विद्यार्थ्यांना सी-10 बसव्यतिरिक्त दुसरी सार्वजनिक उपक्रमाची वाहतूक व्यवस्थाच नाही. सी-10 ही बस बॅकबे आगार ते आणिक आगार, प्रतीक्षा नगर, शीव-कोळीवाडा या मार्गावर चालवली जात असल्याने त्या रहिवासी आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लोक, लहान मुले आणि महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याकडे अॅड. मेराज शेख यांनी बेस्ट उपक्रमाचे लक्ष वेधले आहे.
 
             
		





































 
     
    




















