
आडते असोसिएशनचे अध्यक्ष अनिरूद्ध उर्फ बापू भोसले यांच्या मनमानी कारभारामुळे पुण्यातील आडत व्यवसाय तब्बल 80 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या तीन वर्षांत व्यवसाय वृद्धीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. मनमानी, बेकायदेशीर कारभारामुळे आडत व्यवसायाचे चित्र काळवंडले असून, आडत्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांचेही दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, बाजार समितीच्या आवारातील आडत व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे, असा आरोप मार्केट यार्डातील आडत्यांनी केला केला आहे.
आडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध भोसले यांना अनुभव नसताना आडत्यांनी विश्वासाने निवडून दिले. मात्र, गेल्या तीन वर्षांत व्यवसाय वृद्धीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. मनमानी काराराने गेल्या दोन वर्षांत वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही, मुदत संपूनही निवडणूक लावली नाही, आणि संस्थेच्या कामकाजात प्रचंड अनियमितता, अपूर्णता व कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. हिशोब प्रमाणित न करणे, शासकीय पूर्ततेत गोंधळ, आणि सदस्यांना माहिती न देणे यामुळे आडत्यांमध्ये संताप उसळला आहे. अनधिकृत व्यापार, विभागाबाह्य आडत, कामगारांची अवास्तव मजुरी, ‘जी-५६’ सारख्या बेकायदेशीर दुबार विक्री केंद्रांना खतपाणी, शेतकर्यांच्या वाहनांकडून मान्यतेपेक्षा जास्त पैसे वसुली, उधारीतील २० टक्के रक्कम सक्तीने वसूल करणे, न दिल्यास त्रास देणे, रस्त्यावरच व्यापार सुरू करणे अशा गंभीर गैरप्रकारांची चर्चा सुरू असल्याचा आरोप आडतदार समीर मोरडे, निलेश शिंदे, दत्तात्रय थोरात, प्रविण जवळकर, अमोल टेमकर संतोष खेडेकर आदींना केला आहे.
कायदेसंमत आडत व्यवसायातून शेतकरी हित सर्वोच्च मानून आम्ही डिसेंबर २०२४ मध्ये बाजार समितीला किमान ३०० टक्के व्यापारवाढीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आडते असोसिएशन आणि बाजार समिती संचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकरी व आडत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
– किशोर कुंजीर, फॅक्ट–इंडिया.
बाजार समितीचे सेस उत्पन्न तब्बल २२ कोटींनी वाढले आहे. त्यामुळे व्यापार कमी झाल्याचा आडत्यांचा दावा पूर्णतः खोटा ठरतो. मला आडत्यांनीच बहुमताने निवडून दिले आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवावी आणि आडत्यांचे प्रश्न सोडवावेत.
— अनिरुद्ध भोसले, अध्यक्ष, आडते असोसिएशन
 
             
		





































 
     
    






















