
>> वसंत भोईर
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पण अद्यापि एक छदामही मिळालेला नाही. वाड्यातील शिलोत्तर गावातील पूरग्रस्त शेतकरी मधुकर पाटील यांची तर क्रूर थट्टा केली आहे. सरकारची भरपाई सोडाच, पण पाटील यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फक्त 2 रुपये 30 पैसे जमा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अजब सरकारच्या या गजब न्यायामुळे देवा रे देवा… हीच का नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पीक विमा हमी, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
पालघर जिह्यात शेतकरी भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. वाडा तालुक्यातील शिलोत्तर गावात राहणारे मधुकर पाटील यांनी सात एकर जमिनीमध्ये भाताची लागवड केली होती. सुमारे 80 हजार रुपये त्यासाठी खर्च केले. हे पीक व्यवस्थित आले असते तर त्यांना अंदाजे दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. मात्र हे पीक पावसाने उद्ध्वस्त करून टाकले.
… आणि पायाखालची जमीनच सरकली
मधुकर पाटील यांचे 80 टक्क्यांहून अधिक पीक आडवे झाले. त्यांनी संपूर्ण शेतीचा पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत विमा उतरवला होता. फडणवीस सरकारने दिवाळी संपून गेली तरी मदतीचा शब्द पाळला नाही. त्यामुळे किमान पंतप्रधान पीक विमा योजनेतून तरी थोडेफार पैसे मिळतील अशी त्यांना आशा होती. 31 ऑक्टोबर रोजी पाटील यांच्या आयडीबीआय बँक खात्यात पीक विमा कंपनीकडून पैसे जमा झाले. तसा त्यांच्या मोबाईलवर मेसेजदेखील आला, पण त्यावरील रक्कम पाहताच मधुकर पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही रक्कम होती फक्त 2 रुपये 30 पैसे. त्यांच्या कुटुंबालाही आश्चर्याचा धक्का बसला.
- मधुकर पाटील यांना पत्नी, एक मुलगी व एक मुलगा आहे. मुलगा 11वीत असून मुलीचे लग्न झाले आहे. उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.
मोदींनी आम्हाला फसवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पीक विमा योजना आहे. त्यातून मिळणाऱया पैशातून काहीसा दिलासा मिळेल असे वाटले होते. अवकाळी पावसानंतर राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले, पण त्याचा एक रुपयाही अजून मिळालेला नाही. आता तर थेट मोदींनीच मला फसवले असून देवा… आता दाद कुणाकडे मागू, असा आर्त सवाल मधुकर पाटील या शेतकऱयाने केला आहे.





























































