मुंबईत आमचाच महापौर होऊ दे! उद्धव ठाकरे यांचे श्री देव वेताळाला साकडे

‘मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर होऊ दे’ असे साकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री देव वेताळाच्या चरणी घातले. मागाठाणे येथे शिवसेनेच्या वतीने मालवणी जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह या जत्रोत्सवाला भेट दिली. जत्रोत्सवात श्री देव वेताळाचे मंदिर साकारण्यात आले आहे. तिथे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी जुनी आठवण सांगितली. ‘2012 मध्ये इथेच आपण गाऱहाणे घातले होते की, मुंबईत शिवसेनेचाच महापौर होऊ दे आणि त्यानंतर सुनील प्रभू महापौर झाले होते. तसेच गाऱहाणे आता श्री देव वेताळाला घातले आहे,’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मला विश्वास आहे, बाकी कुणी ऐको न ऐको, पण देव आपला आहे आणि तो आपले ऐकल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. आपला मोर्चा झाला. त्यानंतर आता सर्वांनी सावध राहिले पाहिजे. नाहीतर मुंबईत आता जेवढे दिसतोय तेवढे पण पुढील पाच वर्षांत दिसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. जुने कार्यकर्ते आजही धडपड करत आहेत, कारण संघर्ष म्हटला की मराठी माणूस मागे हटत नाही. अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. तीच जिद्द, तीच हिंमत आपल्याला दिलेली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.