क्रिकेटनामा – अर्शदीपचा फर्शदीप करू नका!

>> संजय कऱ्हाडे

अखेर तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात हिंदुस्थानी संघाने छान विजय मिळवला. पाच गडी आणि तीन चेंडू राखून ऑस्ट्रेलियाच्या अरे ला कारे म्हटलं. आता आपण ‘आगौ’शी थोडं प्रेमाने बोलू.

‘आगौ’, तुम्ही अर्शदीपचा संघात समावेश केला याला प्रयोग म्हणू नका. बुमरा आणि अर्शदीप हे आपल्या संघाचे अविभाज्य घटक असायलाच हवेत. हेच दोन गोलंदाज आपल्याला विश्वचषकापर्यंत नेऊ शकतात याची पंबरेला गाठ मारून ठेवा. अर्शदीपचा फर्शदीप करू नका! अर्शदीपच्या जिद्दीची मात्र मला कमाल वाटते. टी-ट्वेंटीमध्ये हिंदुस्थानतर्फे सर्वाधिक बळी घेणारा हा जलदगती गोलंदाज. वारंवार संघाबाहेर ठेवून त्याचा अपमान केला जातो. पण गंमत पहा, तो शांत राहतो, संधीची वाट पाहतो अन् मिळाली की किमया करून जातो. आजही त्याने तीन बळी मिळवले. त्यातले दोन पॉवर प्लेमध्ये! वाटतं, त्याला संघाबाहेर ठेवणाऱ्यांना तो एकेक बळी घेताना एकेक थोतरीत मारत असतो!

‘आगौ’, ज्या राणाजींना तुम्ही कपिलदेव बनवण्याच्या प्रयत्न करत आहात त्याला आधी हार्दिक पांडय़ापर्यंत तरी धाव मारू द्या! अनेकांनी हार्दिकलासुद्धा दुसरा कपिलदेव म्हटलं होतं! आज बहुतेक वेळा हार्दिक एका ना दुसऱ्या दुखापतीमुळे संघाबाहेर राहतो! तुमच्या सुदैवाने हर्षितचा किमान फिटनेसचा तरी इस्कोट नाही. तुमच्या अथक प्रयत्नांती हर्षित असलाच तर तिसरा गोलंदाज म्हणून येत्या काळात नावारूपाला येऊ शकेल!

आता वॉशिंग्टन सुंदरबद्दल. कप्तान सूर्याने अभिषेक शर्माच्या हाती चेंडू दिला, पण सुंदरकडे नाही! सूर्या, आता ‘आगौ’च्या रांगेत तुला बसवायचं का? नियमित गोलंदाज अपयशी ठरला तर अनियमित गोलंदाजाला हाक मारण्यात चूक नाही. पण शेवटी काय झालं? ज्याच्याकडे तू ढुंकूनही बघितलं नाहीस, त्याच्याच फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला. मग तुझ्या फलंदाजीतल्या अपयशानंतरही तुला कप्तानपदी कायम ठेवण्यात आल्याचे पांग तू फेडतोस असं म्हणायचं का? आजच्या क्षणी कप्तानपद राहू दे, संघातही तुझी जागा नाहीये हे तुला कबूल करावंच लागेल! तेच शुभमनबद्दलही म्हणावं लागेल. त्याच्या दरवाजाबाहेर यशस्वी जयस्वाल बसलाय!

खरं तर ‘आगौ’ने संजू सॅमसनची पुरती वाट लावल्यानंतर जितेश शर्मा पटलावर आलाय. आता संजूची माय मारण्याची जी काही शिक्षा असेल ती त्यांना मिळेलच. पण जितेशने आयपीएल आणि स्थानिक स्पर्धांत सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. कालही त्याने त्याची चमक दाखवली. जितेश शर्माचं स्वागत आहे!

‘आगौ’, काही योग्य बदल केल्यामुळे आपल्याला विजय मिळाला म्हणून मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. आपल्या विजयाचा मला आनंदही झालाय. पण ऑस्ट्रेलियाने त्यांच्या संघात हेझलवूडच्या रूपाने बदल करून तुमच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे असंही मला ठणकावून म्हणायचंय!