
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 च्या सामन्यात रविवारी अमेरिकेने (यूएसए) इतिहास रचला. संयुक्त अरब अमिरात (यूएई) संघाचा केवळ 49 धावांत खुर्दा उडवत अमेरिकेने विक्रमी 243 धावांनी विजय मिळवला. या विजयासह वन डे इतिहासातील सर्वात मोठय़ा धावांच्या फरकाने जिंकण्याचा नवा विक्रम अमेरिकेच्या नावावर नोंदवला गेला. अमेरिकेकडून मिळालेल्या 293 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईच्या फलंदाजांनी अगदीच निराशाजनक सुरुवात केली. अमेरिकेच्या वेगवान गोलंदाज जसिंध उमराक (5/22) आणि कर्णधार सौरभ नेत्रावळकर (3/4) यांनी गोलंदाजीतील अचूकता आणि दिशा दाखवत यूएईच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला लावले. त्यांच्याकडून केवळ जुनेद सिद्दिकीलाच (10) दुहेरी धावा करता आल्या. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने 3 बाद 292 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. अमेरिकेची 3 बाद 28 अशी अवस्था असताना साई मूकम्मल्ला (नाबाद 137) आणि मिलिंद कुमार (नाबाद 123) यांनी चौथ्या विकेटसाठी 264 धावांची अभेद्य भागिदारी करीत धावांचा डोंगर उभारला.
            
		





































    
    



















