
अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना त्यांना भरपाई तर सोडाच पण बळीराजाची सरकार क्रूर चेष्टा करीत आहे. वाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्याला पीक विम्याचे फक्त २ रुपये ३० पैसे मिळाल्याची घटना उघडकीस येऊन २४ तास उलटत नाही तोच कर्जत पोलीस ठाण्यातील पोलिसांचा अजब कारभारही चव्हाट्यावर आला आहे. एक शेतकरी चोरीला गेलेल्या बैलाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला. आपल्याला तिथे न्याय मिळेल अशी त्याला अपेक्षा होती. मात्र ड्युटीवरील पोलिसाने तक्रार घेण्यापूर्वी आधी बैलाच्या जन्म तारखेचा दाखला दाखवा, असे अजब फर्मान सोडले. त्यामुळे शेतकरीही अचंबित झाला.
कर्जत तालुक्यातील अंजप गावात तानाजी माळी या शेतकऱ्याचे घर आहे. शेतीबरोबरच त्याच्याकडे चार बैल व काही गाईदेखील आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. अवकाळी पावसाचा फटका या शेतकऱ्यालाही बसला. माळी याच्या घराबाहेर असलेल्या गोठ्यातून काही बैल बाजूच्या घरासमोरील अंगणात होते. पहाटेच्या सुमारास काही चोरटे आलिशान गाडी घेऊन आले आणि एका बैलाला बळजबरीने गाडीत कोंबून पसार झाले.
आग्रह धरल्यानंतर गुन्हा दाखल
पायपीट केल्यानंतर ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तुम्हाला बैलाच्या चोरीची तक्रार नोंदवायची असेल तर आधी त्याच्या जन्माचा दाखला दाखवा असे सांगितले. पोलिसांच्या या कृतीमुळे शेतकऱ्याला काय बोलावे हे कळेना. अखेर माळी याने जास्त आग्रह धरल्यानंतर बैल चोरीची तक्रार दाखल करून घेण्यात आली. तसेच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.




























































