
‘रिच डॅड पुअर डॅड’ या लोकप्रिय पुसत्काचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी अनेकदा सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये मोठी घसरण दिसून आली. त्यानंतरही कियोसाकी सोने-चांदी आणि बिटकॉइनच्या खरेदी करण्याच्या सल्ल्यावर ठाम आहेत. आता त्यांनी एका मोठ्या मंदीचा इशारा दिला आहे. ते म्हणतात की अमेरिकन बाजार गंभीर संकटात आहे. आता लाखो लोक उद्ध्वस्त होतील… त्यांना आर्थिक डोलारा सावरणे कठीण होईल,असे त्यांनी स्पष्ट करत या कठीण परिस्थितीत स्वतःचे आर्थिक संरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
सोने आणि चांदीच्या किमती कोसळत आहेत, तर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही घसरण होत आहे. सोने-चांदीच्या घसरणीबाबत रॉबर्ट कियोसाकी यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकन शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे, त्यात ते म्हणाले आहेत की जागतिक मंदी सुरू झाली आहे आणि त्यामुळे लाखो लोक उद्ध्वस्त होतील.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स) वर सोने, चांदी आणि क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणारे रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या नवीन पोस्टमध्ये म्हटले आहे की, मोठी जागतिक मंदी सुरू झाली आहे, त्यात लाखो लोकं उद्ध्वस्त होतील. स्वतः आर्थिक सक्षम बना. शेअर बाजार आर्थिक मंदीसारख्या परिस्थितीचा सामना करत असल्याने लवकरच वॉल स्ट्रीटमधून लाखो डॉलर्स गायब होऊ शकतात, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष सोने, चांदी आणि बिटकॉइनवर केंद्रित केले आणि अडचणीतून बाहेर पडण्याचा तोच एकमेव मार्ग असल्याचे स्पष्ट केले. अत्यंत अस्थिरतेच्या काळात हे सर्वात सुरक्षित आर्थिक गुंतवणूक आहेत, असे ते म्हणाले. स्टॉक, बाँड्स हे सर्व आभासी चलन आहे, तर सोने आणि चांदीसारखे मौल्यवान धातू ही खरी संपत्ती आहे, जी महागाई आणि आर्थिक संकटापासून बचाव करू शकतात. त्यामुळे जागतिक मंदीच्या संकटातून वाचण्यासाठी यात गुतंवणूक करण्याचा आपला सल्ला आहे, असेही त्यांनी सांगितले.
            
		





































    
    























