
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतजमीन, शेतपीके, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा योजना, पशुधन तसेच विविध पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या केंद्रीय पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीत केंद्र सरकारचे संयुक्त सचिव व केंद्रीय पथकाचे प्रमुख आर. के. पांडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अरविंद वाघमारे, गृह मंत्रालयाचे आशिष गौर, इस्रोच्या एस. एफ. एनआरएससी संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. एस.व्ही.एस.पी. शर्मा, तसेच रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे हेही उपस्थित होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडूरंग गायसमुद्रे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता श्री. पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पॉवर पॉइंटच्या माध्यमातून सादर केला. त्यांनी शेतजमीन व शेतपीकांचे नुकसान, मनुष्यहानी, पशुधन हानी, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, मदत वितरण, पुनर्वसन कार्य आणि पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीबाबतची माहिती केंद्रीय पथकाला दिली.
५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय पथकाची नुकसानग्रस्त भागांना भेट
केंद्रीय पथक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील विविध नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाणार आहे.


























































