
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात स्थापन केलेल्या राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीला टाळे लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला आहे. लाडक्या बहिणींमुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढत असल्यामुळे एकामागोमाग एक लोकप्रिय योजना बंद करण्यात येत आहेत. त्यापाठोपाठ आता ही कंपनीही बंद करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
केंद्र शासनाच्या नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महा आर्क लिमिटेड ही कंपनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्याबैठकीत एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. या कंपनीची निबंधकांकडे नोंदणीही करण्यात आली होती. सुरुवातीला या कंपनीचे भागभांडवल 111 कोटी होती. त्यानंतर वित्त विभागाने या कंपनीचे भागभांगवल हे 311 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे वित्तमंत्री होते.
सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे एकामागोमाग एक योजना बंद करण्यास सुरुवात केली आहे. आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, एक रुपयात पीक विमा योजना एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेल्या किमान दहा योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी बंद करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणता निर्णय घेतला?
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महा आर्क लिमिटेड बंद करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. रिझर्व्ह बँकेने राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीस परवाना नाकारला आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्टय़ा कंपनीचे कामकाज करणे अशक्य होणार आहे. या कंपनीवरील खर्च सुरू राहू नये यासाठी कंपनी बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.



























































