
मुरुड-जंजिरा किल्ल्याचे दार पुन्हा एकदा उघडले आहे. खराब हवामानामुळे गेल्या नऊ दिवसांपासून जंजिऱ्यावर पर्यटकांना नो एण्ट्री करण्यात आली होती. मात्र आता किल्ला सर्वांसाठी खुला केला आहे. त्यामुळे पर्यटकांना दिलासा मिळाला असून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटचालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
जंजिरा किल्ल्यातील राजमहाल, दोन गोड्या पाण्यातील तळी, गोड्या पाण्याची विहीर, पंचधातूंनी मढवलेली कलाल बांगडी तोफ, भुयारी मार्ग, तोफखाना व खुष्कीचा दरवाजा आदी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. मात्र अचानक हवामानात बदल झाल्याने हा किल्ला पर्यटकांसाठी बंद केला होता. खवळलेला समुद्र, उंचच उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यामुळे बंदर विभागाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी शिडाच्या बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला. जंजिरा किल्ला बंद करण्यात आल्याने लाखो पर्यटकांचा हिरमोड झाला होता.
जेट्टी सुरू करा
नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी जंजिरा किल्ला खुला झाला आहे अशी माहिती पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी दिली. या किल्ल्याच्या मागील बाजूस ब्रेक वॉटर बंधारा टाकून त्या ठिकाणी जेट्टी उभारण्यात आली आहे. ती लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून पर्यटकांना सुरक्षित किल्ला पाहता येईल, अशी मागणी पर्यटकसह स्थानिकांनी केली आहे.































































