मतदार यादीतील घर क्रमांक ‘शून्य’ची नेमकी भानगड काय आहे?

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ‘मतांची चोरी’ या मुद्द्यावर प्रेझेंटेशन दिले. यावेळी त्यांनी मतदार यादीतील घर क्रमांक ‘शून्य’ची नेमकी भानगड काय आहे? याचे उत्तर ही दिले.

राहुल गांधी यांनी मतदार यादीत मतदारांचा पत्ता, घर क्रमांक शून्य यावर आक्षेप घेतले होते. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले होते की, घर क्रमांक शून्य हे बेघर लोकांसाठी आहे. ज्यांना घर नाही, जे रस्त्यावर राहतात त्यांचा पत्ता हा घर क्रमांक शून्य लिहिला जातो. निवडणूक आयुक्तांनीही स्पष्टीकरण दिले तरी काँग्रेस पक्षाने याचा तपास केला. जेव्हा हा पत्ता तपासला, तेव्हा तो बेघर व्यक्तीचा नव्हता, तर त्या घरात नरेंद्र नावाचे एक गृहस्थ राहत होते, अशी माहिती त्यांनी दिली.

घर क्रमांक शून्य देण्यामागचे कारण हे आहे की, ती व्यक्ती कुठे आहे, हे कोणालाही ओळखता येऊ नये. एकदा का त्या मतदाराने मतदान केले की तो गायब होतो, अशी अनेक उदाहरण आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त उघडपणे जनतेशी खोटे बोलत आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

दुसरे उदाहरण देत राहुल गांधी यांनी सांगितलं की, पलवलचे भाजप जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जे घर क्रमांक १५० मध्ये राहतात, त्यांच्या घरात ६६ मतदार राहतात असे दाखवले आहे. आता घर क्रमांक २६५ तपासले जिथे ५०१ मतदार राहतात. पण जेव्हा तुम्ही त्यांना शोधायला जाल, तेव्हा ते तुम्हाला तिथे सापडत नाहीत, का? जेणेकरून हे लोक अस्तित्वात आहेत की नाही किंवा ते कुठे आणि कसे मतदान करतात, हे कोणीही तपासू शकणार नाही.

नियमानुसार जर एखाद्या घरात १० लोक राहत असतील, तर त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. हा निवडणूक आयोगाचा नियम आहे, पण कोणती पडताळणी झाली का? तर स्पष्ट दिसते, अशी पडताळणी झालेली नाही, असेही ते म्हणाले.