
महायुती सरकारच्या ‘पोकळ’ विकासाची बुधवारी पुन्हा एकदा पोलखोल झाली. वारंवारच्या तांत्रिक बिघाडानंतर प्रवासी सेवेसाठी बंद केलेल्या मोनोरेलची नवीकोरी गाडी घसरली आणि पहिला डबा हवेत उडून थेट दुसऱया बीमवर जाऊन आदळला. त्यात गाडीचे मोठे नुकसान झाले, तर मोनोरेलच्या कॅप्टनला दुखापत झाली. सुदैवाने ट्रेन ट्रकवरून खाली कोसळली नाही. वडाळा स्थानकाजवळ सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नव्याकोऱ्या गाडीच्या चाचणीदरम्यान ही दुर्घटना घडली. त्यामुळे मोनोरेलच्या प्रवासी सुरक्षेचा गंभीर प्रश्न कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
11 वर्षांपूर्वी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या मोनोरेलच्या सेवेचा गेल्या काही महिन्यांत बोजवारा उडाला आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये दोनदा प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱया घटना घडल्या. जुन्या गाडय़ांमध्ये वारंवार बिघाड होऊ लागल्यानंतर 20 सप्टेंबरला मोनोरेलची प्रवासी सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली. त्यानंतर कोटय़वधी रुपयांच्या नव्या गाडय़ांची चाचणी (ट्रायल रन) घेतली जात आहे. याचदरम्यान बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास नव्या गाडीला भीषण अपघात झाला. मोनोच्या वडाळा डेपोमधून बाहेर पडलेल्या नव्या गाडीने वळण घेत असताना ट्रक सोडला आणि ती थेट दुसऱया बीमवर जाऊन आदळली. गाडीचा पहिला डबा पूर्णपणे ट्रकवरून घसरला. त्याची दुसऱया बीमला जोरदार धडक बसल्याने दर्शनी आणि तळाच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सदोष सिग्नल यंत्रणेमुळे संचलन नियंत्रण कक्षाला गाडीचे स्थान ओळखता आला नाही आणि हा भीषण अपघात घडल्याचे सांगण्यात आले. चाचणीदरम्यान गाडीत ट्रेनच्या कॅप्टनसह नव्या गाडीची बांधणी करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचा कर्मचारी होता. त्यापैकी ट्रेनच्या कॅप्टनच्या डोक्याला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच तातडीने मोनोरेलचे कर्मचारी, अग्निशमन दलाच्या गाडीसह अन्य आपत्कालीन यंत्रणांनी धाव घेतली आणि गाडीत अडकलेल्या दोघा कर्मचाऱयांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. या घटनेने मोनोरेलच्या नव्या गाडय़ांची सुरक्षा तसेच एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन या यंत्रणांच्या कार्यपद्धतीबाबतही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मेट्रो प्रशासनाचे अपयश
काही अधिकाऱयांनी ‘मॉकड्रिल’ असल्याचा केलेला दावा रहिवाशांनी खोडून काढला. अशा घटना वारंवार घडत असतील तर महा मुंबई मेट्रो प्रशासनाचे मोठे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया मोनो रेल्वे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत घाडगे यांनी दिली.
मोनोच्या अधिकाऱ्यांनी उत्तर न देताच पळ काढला!
अपघातस्थळी मोनोरेलचे अधिकारी दाखल झाले होते. त्यांना अपघातामागील कारणाबाबत पत्रकारांनी प्रश्न केले, मात्र त्या प्रश्नावर उत्तर न देताच मोनोरेलच्या अधिकाऱ्यांनी तेथून पळ काढला. यादरम्यान काही पत्रकारांना धक्का देण्यात आला. त्यानंतर अधिकारी एका कार्यालयात शिरले आणि त्याचे गेट बंद करून पत्रकारांना बाहेरच रोखण्यात आले. मोनोरेलच्या या ‘लपवाछपवी’वर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
प्रशासन म्हणते, ही किरकोळ घटना!
एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील एमएमआरडीएच्या अख्यत्यारित येणाऱया महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत मोनोरेलचे व्यवस्थापन सांभाळले जात आहे. या प्रशासनाने अपघातानंतर लगेच स्पष्टीकरण देताना ‘ही किरकोळ स्वरुपाची घटना’ असल्याचे धक्कादायक उत्तर दिले. परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली गेली. मोनोरेलची चाचणी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडण्यात आली, असा दावा प्रशासनाने केला. मात्र प्रत्यक्षात ट्रकवर लटकलेल्या मोनोरेलचे भयावह चित्र पाहून मुंबईकरांनी प्रशासनाच्या दाव्यावर सडकून टीका केली.

























































