
हरयाणातील मतचोरीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या सादरीकरणाचे शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काwतुक केले. ’हे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने पाहण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
‘भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक आयोग कसा मदत करतो आहे हे राहुल गांधी यांनी पुन्हा दाखवून दिले आहे. आपल्या देशात निवडणुका कशा चोरल्या जात आहेत हे जग बघत आहे. हा विषय राजकारण किंवा विचारधारेशी संबंधित नाही. हा विषय केवळ एका पक्षाला मतचोरीसाठी मोकळे रान देऊन नागरिकांच्या मतांचे मूल्य शून्य करण्याशी संबंधित आहे. त्यामुळे कोणी राहुल गांधी, काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी सहमत असेल किंवा नसेल, पण मतचोरीवर त्यांनी जे मांडले ते पाहण्यासारखे आहे. ही लढाई मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी आहे. ही लढाई लोकशाही आणि संविधानासाठी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.
आयोगामुळे लोकशाहीची प्रतिमा मलिन
‘काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने वरळी आणि महाराष्ट्रातील काही इतर मतदारसंघांतील मतदारांची फसवणूक उघडकीस आणली. त्या विरोधात मोर्चाही काढला. परंतु निवडणूक आयोगाने कारवाई करण्यास नकार दिला. मागच्या काही वर्षांत निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीची प्रतिमा खराब केली आहे. पक्षपाती निवडणुका घेणारी फ्रॉड लोकशाही अशी ओळख आपल्या लोकशाहीची झाली आहे, असा संताप आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.


























































