राज्यातील हजारो बेरोजगारांचा नाशिकमध्ये प्रतीकात्मक कुंभमेळा; श्रीरामकुंडात केले स्नान, महायुतीने फसवले… आमची या साडेसातीतून सुटका करा!

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षण घेऊनही कामच मिळत नसल्याने राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थींनी सरकारविरोधात आज नाशिकमध्ये धडक दिली. प्रातिनिधिक स्वरूपात काही जणांनी श्रीरामकुंडात स्नान करून आंदोलन छेडले. देवा मामा, एकनाथ मामा, अजित मामा कुठे आहेत, अशा घोषणा देत आमची साडेसातीतून सुटका करा, महायुती सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा, असे साकडे त्यांनी गोदामातेला घातले. हा आमचा प्रतीकात्मक कुंभमेळा असून, यानंतरही प्रश्न सुटला नाही तर आमरण उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारने विधानसभा निवडणुकीवेळी राज्यातील तरुण-तरुणींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (लाडका भाऊ) योजनेतून मानधन आणि रोजगार देण्याची घोषणा केली. हे प्रशिक्षण घेऊनही आज राज्यातील 1 लाख 34 हजार तरुणांना कायमस्वरूपी काम मिळालेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारने वाऱयावर सोडले. सरकारच्या पत्राचा उपयोग होत नाही, यामुळे हजारो तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सरकारने शब्द पाळला नसल्याने हक्काच्या भाकरीसाठी तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शिंदेंविरोधात ठाण्यात, मुंबई आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर आज ह.भ.प. तुकाराम महाराज आणि बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली या अन्यायग्रस्त प्रशिक्षणार्थींनी नाशिक गाठले. आज पाच हजार आंदोलक नाशिकला दाखल झाले. त्यांनी दुपारी सीबीएसजवळील शिवतीर्थावर ठिय्या मांडला. लाडके मामा एकनाथ मामा, देवेंद्र मामा, अजित मामा यांच्याविरोधात घोषणा दिल्या.

गोदामातेनेच आम्हाला न्याय द्यावा, कायमस्वरूपी रोजगार मिळावा, म्हणून नाशिकला सिंहस्थ कुंभमेळ्याआधी प्रतिकात्मक कुंभमेळा भरवत आहोत, असे तुकाराम महाराज यांनी सांगितले. पोलिसांच्या विनंतीमुळे सर्वच युवक गोदाकाठावर दाखल झाले नाहीत. प्रातिनिधीक स्वरुपात आम्ही स्नान करून गोदामातेकडे व्यथा मांडल्या आहेत, असे ते म्हणाले.

लाडक्या मामांविरोधात आमरण उपोषण

अकरा महिने काम केल्यानंतर पुढे काय करायचं, याचं आम्हाला सरकारने उत्तर दिलेलं नाही. हक्काच्या भाकरीसाठी आमचे हे गोदाकाठी आमरण उपोषण असणार आहे. आज पाच हजार बेरोजगार तरुण नाशिकला आले आहेत, उद्या पंचवीस हजार येतील, असे बालाजी पाटील चाकूरकर म्हणाले.