
रयत शिक्षण संस्थेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून सांगली, कोल्हापूर जिह्यांतील 19 लोकांची 38 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सदाशिव कल्लाप्पा नाईक (रा. तासगाव ता. सातारा) याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली. सदाशिव नाईक हा रयतमध्ये शिपाई असून, त्याने ‘रयत’ची खोटी नियुक्तीपत्रे दिल्याचेही समोर आले आहे.
याप्रकरणी नंदकुमार शंकर पाटोळे (वय 43, रा. भवानीनगर, वाळवा, जि. सांगली) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फसवणुकीची घटना नोव्हेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान घडली आहे.
तक्रारदार पाटोळे आणि संशयित सदाशिव नाईक यांची ओळख झाली. नाईक याने तो रयत शिक्षण संस्थेच्या एनकूळ (ता. खटाव) शाळेत शिपाई असल्याचे सांगत त्याच शाळेत शिपाई, क्लार्क, शिक्षक व लॅब असिस्टंट पदाच्या जागा सुटल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव, अध्यक्ष व संचालक ओळखीचे आहेत. कोणी मुले, मुली असतील त्यांना आपण नोकरी लावू शकतो, असे त्याने सांगितले.
शिपाई पदासाठी 6 लाख, क्लार्कसाठी 12 लाख, शिक्षकासाठी 15 लाख रुपये याप्रमाणे पैसे द्यावे लागतील. सुरुवातीला अर्ज भरताना 2 ते 3 लाख रुपये लागतील, असेही संशयित सदाशिव नाईक याने तक्रारदारांना सांगितले. याच पद्धतीने तक्रारदार, त्यांचे मित्र व इतर 19 जणांनी संशयित नाईक याला वेळोवेळी रोख, ऑनलाइन असे 38 लाख 40 हजार रुपये पाठवले. भरतीची प्रक्रिया झाल्यानंतर संशयित नाईक याने प्रत्येकाला रयत शिक्षण संस्थेचे नियुक्तीपत्र देखील दिले.
यांची झाली फसवणूक
भारत बुधावले, ज्योती बुधावले, सागर कांबळे, दिगंबर मंडले, सौरभ माने, भोलानाथ माने, अनिकेत कुंभार, सागर कुंभार, अजित कुंभार, विकास पाटील, निकीता ठोके, योगेश भोसले, अक्षय सकळे, प्रशांत साळुंखे, सचिन कोळी, प्रवीण कोळी, गब्बर सकट, जहिर नणंदी (सर्व रा. शिरोळ, कोल्हापूर, शाहूवाडी, पलूस, पन्हाळा)
पोरं संस्थेत अन् नियुक्तीपत्रे खोटी
संशयित सदाशिव नाईक याने दिलेली नियुक्तीपत्रे घेवून संबंधित सर्व मुले, मुली साताऱयातील रयत शिक्षण संस्थेत गेली. तेथे नियुक्तीपत्रे तपासणी केली, असता ती खोटी असल्याचे समोर आले. तसेच संबंधितांना तेथून जाण्यास सांगण्यात आले. फसवणूक झाल्याचे समोर येताच तक्रारदारांनी संशयित सदाशिव नाईक याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.






























































