भाजी विक्रेत्यानं मित्राकडून हजार रुपये उसने घेतले अन् 11 कोटी जिंकले; आता मित्राच्या मुलींच्या लग्नासाठी देणार 50-50 लाख

‘उपरवाला देता है तो छप्पर फाड के’, असे म्हणतात आणि याचाच प्रत्यय राजस्थानमधील कोटपुतळी येथील भाजी विक्रेत्याला आला आहे. मित्राकडून हजार रुपये उसने घेऊन लॉटरीचे तिकीट घेतलेल्या भाजी विक्रेत्याला तब्बल 11 कोटी रुपयांचे बक्षीस लागले. एका रात्रीत भाजी विक्रेता कोट्याधीश झाला. अर्थात मित्राचे उपकार तो विसरला नाही आणि मित्राच्या मुलींसाठीही आपल्याला मिळणाऱ्या पैशातील एक हिस्सा देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अमित सेहरा हा जयपूरमधील कोटपुतळी येथील रहिवासी असून तो भाजी विकतो. अमित मित्र मुकेशसोबत नुकताच पंजाबला गेला होता. दोघे एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबलेले असतानाच मुकेशने अमितला रतन लॉटरी एजन्सीबाबत सांगितले.

अमितकडे तिकीट घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने मुकेशकडून हजार रुपये उसने घेतले. या हजार रुपयात त्याने लॉटरीचे दोन तिकीट खरेदी केले. यापैकी एका तिकीटाला लॉटरी लागली असून त्याने 11 कोटी रुपये जिंकले आहे. अर्थात कोट्याधीश झाल्यानंतरही अमित मित्राला विसरला नाही आणि त्याने आपल्याला केलेल्या मदतीची परतफेड करण्याचे ठरवले. त्याने मुकेशच्या मुलींच्या लग्नासाठी प्रत्येकी 50-50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

अमितने बठिंडा येथे लॉटरीचे दोन तिकीट घेतले होते. यापैकी एकाला जॅकपॉट लागला. दुसऱ्या तिकिटानेही हजार रुपये जिंकले, अशी माहिती त्याने एएनआयशी बोलताना सांगितले. अनपेक्षित धनलाभ झाल्याने 32 वर्षीय अमित रातोरात कोट्याधीश झाला. लॉटरी विकणाऱ्या व्यक्तीने अमितला कॉल करून ही गुड न्यूज दिली. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अमित कुटुंबासोबत बठिंडा येथे गेला. यावेळी त्याने आपल्या भावनाही व्यक्त केल्या.

अमितने मी हनुमानाचा भक्त असल्याचे सांगितले. माझे सगळे दु:ख आज संपले असून मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. पंजाब सरकार आणि लॉटरी एजन्सीचे आभार, असे म्हणत अमितने लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे देणाऱ्या मित्राच्या दोन्ही मुलींच्या लग्नासाठी 50-50 लाख रुपये देण्याची घोषणा केली. बाकीचे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर बांधण्यासाठी वापरणार असल्याचेही अमितने सांगितले.