
सावंतवाडी तालुक्यातील बांदा परिसरात तेरेखोल नदीपात्रात हत्ती आंघोळ करत असताना त्याच्यावर सुतळी बॉम्ब फेकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वन विभागाने पत्राद्वारे याबाबत तातडीने खुलासा केला आहे. ‘हत्तीला त्रास देण्याचा नव्हे, तर त्याचा जीव वाचवण्याचा हेतू होता,’ असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
2 नोव्हेंबर रोजी इन्सुली परिसरात हत्तीने भातशेती आणि केळी बागायतीचे नुकसान केले होते. यादरम्यान हत्ती तेरेखोल नदीपात्रातून किनारी आला. तेथे सूर्यकांत महादेव दळवी यांच्या मालकीचा विद्युत मोटरपंप नदीत होता. हत्ती त्या मोटरपंपाचा पाईप आपल्या सोंडेने ओढत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. मोटरपंप विद्युत उपकरणासह पाण्यात पडल्यास हत्तीला विजेचा तीव्र धक्का लागून जीव गमावण्याची शक्यता होती, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान या कृतीमध्ये हत्तीला कोणतीही इजा किंवा हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतल्याचेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांना आवाहन
वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हत्तीला कोणतीही हानी होणार नाही यासाठी अपवादात्मक परिस्थितीतच फटाक्यांचा वापर केला जातो. ज्या भागात हत्तीचा वावर आहे तेथे नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नये. वन्यहत्तीस कोणत्याही प्रकारची इजा होईल, असे कृत्य नागरिकांनी करू नये.
हत्तीला विजेच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी आणि त्याला मोटरपंपापासून दूर करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले. हा प्रकार हत्तीला त्रास द्यायचा नसून हत्ती नदीतील विद्युत मोटरपंप सोंडेने ओढत असल्याने त्याला रोखण्यासाठीच फटाके फोडण्यात आले. तसे केले नसते तर हत्तीला विजेचा धक्का लागला असता. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पाण्यात हत्तीपासून काही अंतरावर फटाके वाजविण्यात आले. – सुहास पाटील, वन क्षेत्रपाल































































