एसटी घेणार आता व्यावसायिक भरारी; पेट्रोल पंप, ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार

उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या दिशेने राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठे पाऊल उचलले आहे. राज्यभरातील स्वतःच्या 250 पेक्षा जास्त जागांवर एसटी महामंडळ लवकरच व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्ंजग पॉईंटसह रिटेल फ्युएल पंप सुरू करणार आहे. या उपक्रमामुळे एसटी महामंडळाला आर्थिक बळ मिळणार आहे.

महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दररोज सुमारे कोटीहून अधिक प्रवासी एसटीच्या 16 हजारांहून अधिक बसेसद्वारे प्रवास करतात. राज्यातील दुर्गम भाग, गावे आणि लहान शहरांपर्यंत पोहोचणारी ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नसून लाखो लोकांच्या रोजीरोटीचा आधार आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत वाढते डिझेल दर, प्रवासी संख्येतील घट यामुळे एसटीची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. त्यामुळे नवे उत्पन्न स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. गेल्या सात दशकांपासून एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून डिझेल विकत घेत आहे. सध्या 251 ठिकाणी एसटीच्या स्वतःच्या जागेवर पंप आहेत, पण ते केवळ एसटीच्या बसेससाठी वापरले जातात. या अनुभवाच्या जोरावर आता महामंडळाने सर्वसामान्य ग्राहकांसाठीही इंधन विक्री केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या एसटीच्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 250 ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. या ठिकाणी इंधन विक्रीसोबत रिटेल शॉप्स, विश्रांतीगृहे आणि चार्ंजग सुविधा उभारण्याचा मानस आहे.

कसा फायदा होणार?

  • महामंडळाच्या पडिक जागांचा व्यावसायिक उपाय.
  • स्थिर आणि दीर्घकालीन महसूल स्रोत.
  • सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून आधुनिक पायाभूत सुविधा.
  • सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि ई-चार्ंजग एकाच छताखाली.
  • रिटेल शॉप्स आणि सेवांमुळे स्थानिक रोजगार संधी.