‘शिवशाही’च्या संक्रमण शिबिरातील घुसखोरांची ओळख पटणार, सॉफ्टवेअरद्वारे घरांची माहिती मिळणार

आपल्या संक्रमण सदनिकांची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून सॉफ्टवेअर तयार केले जाणार आहे. त्यामुळे मूळ रहिवासी आणि घुसखोरांची ओळख पटवण्यास मदत होणार आहे. तसेच वर्षानुवर्षे शिवशाहीची घरे आपल्या ताब्यात ठेवणाऱया विकासकांना दणका बसणार आहे.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची मानखुर्द, भांडुप, मुलुंड, कांदिवली, मालाड आदी ठिकाणी 5 हजारांहून अधिक घरे असून त्याचा संक्रमण शिबीर म्हणून वापर केला जात आहे. एखादा नवीन एसआरए प्रकल्प हाती घेताना तेथील झोपडीधारकांची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी विकासकांना शिवशाहीची घरे भाडेतत्त्वावर दिल्या जातात. त्यासाठी 40 हजार रुपये डिपॉझिट आणि महिन्याला 7 हजार रुपये भाडे आकारले जाते, मात्र अनेक विकासकांकडे वर्षानुवर्षे ही घरे अडपून पडली आहेत. तसेच काही विकासकांनी ही घरे जादा भाडय़ाने देत असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच सध्या त्या घरांमध्ये कोण वास्तव्यास आहे याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी म्हणून सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असल्याची माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.