40 वर्षांपूर्वी इच्छामरणाचा ड्राफ्ट बनवला, प्रा. सदानंद वर्दे जन्मशताब्दी महोत्सव कार्यक्रमात कुमार केतकर यांची माहिती

प्रा. सदानंद वर्दे यांनी इच्छामरणाचा जो ड्राफ्ट तयार केला त्या प्रक्रियेत माझ्यासह वर्दे, अरुण साधू, मीनू मसानी होते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या वयोवृद्धांना जगणे नकोसे होते, मरण्याची इच्छा असणाऱ्यांना त्रासदायक उपचारातून मुक्त करण्यासाठी सर्व बाजूंनी विचार केलेला ड्राफ्टवर जनमताचा कौल घेतल्यावर प्रा. वर्दे यांनी विधान परिषदेत न मांडण्याचा निर्णय घेतला, असे ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार कुमार केतकर यांनी सांगितले.

वांद्रे येथील नॅशनल कॉलेजच्या सभागृहात प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘सन्मानाचे मरण…शेवटचा उंबरठा’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते. ज्या रुग्णाने मरणाची इच्छा व्यक्त केली असेल त्याला मेडिकल लाईफ सपोर्ट यंत्रणेवर न ठेवता त्याला नैसर्गिकरीत्या मरण द्यावे. त्यात कुणीही हस्तक्षेप करू नये, असे ज्येष्ठ साहित्यिक रामदास भटकळ अध्यक्षीय भाषणात म्हणाले. सुप्रीम कोर्टाने स्वेच्छामरणाच्या विषयावर आता असे रुग्ण ‘लिव्हिंग वील’ करू शकतात असा निर्णय जाहीर केला आहे, वयोवृद्ध रुग्णांना आगाऊ लिव्हिंग वील तयार करता येते.

हे लिव्हिंग वील पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रजिस्टर करून घेऊ शकत असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाचा निर्णय अमलात आणायला हवा, असे लिव्हिंग वीलचे समर्थक डॉ. निखिल दातार यांनी सांगितले. यावेळी प्रा. अजित जोशी, झेलम वर्दे-परांजपे, सुधीर देसाई, निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले, अमरेंद्रनंदू धनेश्वर, निर्मला सामंत, दिनेश गांधी, नीना राऊत, अजित भुरे, प्रभाकर नारकर, प्रमोद निगुडकर, युवराज मोहिते, सुहिता थत्ते, जगदीश नलावडे, शरद कदम, सतीश चिंदरकर, आशीष जाधव, नंदकुमार पाटील उपस्थित होते.