
शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी हातपाय हलवण्याचा सल्ला देणाऱया अजित पवारांना पुण्यात कोटय़वधीची जमीन फुकटातच मिळाली! पण काहीही होणार नाही! फक्त चौकशी होईल. मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देतील. कारण हे मुख्यमंत्री ‘क्लीनचीटर’, असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. मदतीची वाट पाहणारा शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे. दररोज आत्महत्या होत आहेत. असे असताना सरकारकडून फक्त मतांसाठी कर्जमाफीच्या तारखा जाहीर केल्या जाताहेत. लबाड सरकारचा हा लबाड कारभार आहे. त्यामुळे ‘आधी कर्जमुक्ती, नंतरच मत’ अशी ठाम भूमिका घ्या. मतचोर-मतलबी भाजप आणि त्याच्या दोन्ही कुबड्यांना ‘व्होटबंदी’ करून धडा शिकवा, असे आवाहनच उद्धव ठाकरे यांनी केले.
मराठवाडय़ात ‘दगाबाज रे’ शेतकरी संवादात उद्धव ठाकरे यांनी सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेली पॅकेजची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली की नाही याची पाहणी केली. आज त्यांनी परभणी जिह्यातील ताड बोरगाव, ढेंगळी पिंपळगाव आणि जालना जिह्यातील पाटोदा तसेच लिंबोणी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.
शेतकरी संवाद दौऱयात उद्धव ठाकरे यांच्यासमवेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, खासदार संजय जाधव, उपनेते लक्ष्मण वडले, आमदार डॉ. राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार राजेश टोपे, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, रवींद्र धर्मे, भास्कर अंबेकर, महेश नळगे, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, माजी आमदार मीरा रेंगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, अशोक आघाव, रामेश्वर नळगे, बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले–पाटील, महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, युवासेनेचे दीपक बारहाते, डॉ. सुनील जाधव, तालुकाप्रमुख भारत पंडित, माणिकराव काळे, सरपंच नीता माऊली काजळे आदी होते.
सरकारचे नाक दाबल्याशिवाय पर्याय नाही
निवडणुकीपूर्वी मतांसाठी हेच नेते गोड गोड बोलत होते. निवडणूक झाली, सत्ता मिळाली की यांची भाषा बदलली. शेतकरी दररोज आत्महत्या करतोय, पण यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. मुळात मदत जाहीर करतानाच सरकारने लबाडी केली. आता या लबाडांचा कारभार चव्हाटय़ावर आणावाच लागेल. आता गावागावांत ‘अगोदर कर्जमाफी, मगच मत’ असे फलक लावा आणि महायुतीला व्होटबंदी करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
विमा कंपन्यांना धडा शिकवा
शेतकऱयांना पॅकेजची मदत मिळालीच नाही, पीक विम्याचे पैसेही मिळाले नाहीत. शेतकऱयांना पाच रुपये आणि गद्दारांना 50 खोके देणारे हे दगाबाज सरकार! काही ठिकाणी पैसे मिळालेत, पण ते पाहून सरकार गरीब शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत असल्याचे स्पष्ट दिसते. आपत्ती मोठी आहे, पण मदत किती, तर गुंठय़ाला 185 रुपये! हेक्टरी 50 हजार रुपये मदत त्याला मिळालीच पाहिजे. ठिबक सिंचनप्रमाणे मदत देणे चालू आहे. पीकविम्याचे पैसे पंधरा दिवसांत मिळाले नाही तर विमा कंपन्यांच्या कार्यालयात घुसू, असा खणखणीत इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.
हेच ‘साले’ आता सरकारला रडवणार
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱयांना ‘कितीही दिले तरी रडतात साले’ अशी संतापजनक भाषा वापरली होती. त्याचाच संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी भाजपची सालटीच काढली. शेतकरी स्वाभिमानी आहे, तुमचे फुकटचे त्याला नको, हक्काचे आणि न्यायाचेच तो मागतो आहे. पण सरकारने पॅकेजच्या भुलभुलैयात शेतकऱयाला फसवले. आता हेच ‘साले’ सरकारला रडवल्याशिवाय राहणार नाहीत, असा खणखणीत उद्धव ठाकरे यांनी दिला.
मतचोरीतून आलेले सरकार
सगळा भ्रष्ट आणि लबाड कारभार. त्यामुळे मतचोरी करून सत्तेत यावे लागले. माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, वडील चोरले… आता जमिनीही चोरताहेत… न्याय मागितला की नक्षलवादी म्हणतात, अशी यांची वृत्ती! राज्याचा कृषिमंत्री कोण आहे? माहिती आहे का? केंद्रीय पथक पाहणीसाठी आले, कुठे आले, काय पाहिले… देवालाच माहिती. आता आसुड चालवा, नांगर फिरवा, त्याशिवाय राज्य सरकार वठणीवर येणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण योजनाही फसवीच
लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून भाजपने घराघरात भांडणे लावली आहेत. ज्या बहिणींना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना लाभ मिळत नाही ती नावडती का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
शेतकरी हातपाय हलवतोय, म्हणून तुमच्या ताटात जेवण
पुण्यात पार्थ पवारने 1800 कोटींची जमीन 300 कोटींत हडपली. पुण्यात जैन समाजाची जागा बळकावण्याचा प्रयत्न झाला. आता सरनाईकांचाही जमीन घोटाळा समोर येतो आहे. घोटाळय़ांपाठोपाठ घोटाळे उघड होत आहेत. अजित पवार म्हणतात, शेतकऱयांना फुकटात पाहिजे. कर्ज तर फेडावेच लागेल, त्यासाठी हातपाय हलवावे लागतील. आता हातपाय न हलवता जमीन मिळाली ना, फुकटात! लक्षात ठेवा, शेतकरी हातपाय हलवतोय म्हणून तुमच्या ताटात जेवण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.





























































