
महाराष्ट्र विधिमंडळाची दोन्ही सर्वोच्च सभागृहे सध्या विरोधी पक्षनेत्याविना आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेत्याची मुदत ऑगस्ट महिन्यातच संपलेली आहे. त्यामुळे या सभागृहातील विरोधी पक्ष नेत्याचे आसनही रिक्तच आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या मागील पंचवीस वर्षांच्या इतिहासात अशी अभूतपूर्व परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
राज्यघटनेतील तरतुदीनुसार विरोधी पक्षनेता हे पद लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचे पद आहे. राज्य घटनेतील तरतुदीनुसार सत्ताधाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका अत्यंत मोलाची असते, पण सध्या दोन्ही सभागृहांत विरोधी पक्ष नेताच नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. भास्कर जाधव यांच्या नावाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षाचे एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के उमेदवार आलेले नाहीत असे कारण पुढे करीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय घेतलेला नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत 29 ऑगस्ट रोजी संपुष्टात आलेली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अंबादास दानवे यांना निरोप देण्यात आला. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची मध्यंतरी भेट घेतली होती. पण त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
येत्या 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेता नसल्यास अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जाणकारांच्या मते अशी परिस्थिती मागील किमान पंचवीस वर्षांत निर्माण झालेली नव्हती.
संख्याबळाच्या अटीचा खोटा मुद्दा पुढे करून विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त ठेवले आहे. विधान परिषदेत सदस्यसंख्येची अडचण नाही, पण तरीही या सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून सत्ताधाऱयांचा लाखो कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगला जाईल या भीतीने विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवले आहे. – भास्कर जाधव, शिवसेना गटनेते विधानसभा
g विधान परिषदेत काँग्रेसचे सात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन सदस्य आहेत. काही अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. या संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. त्यासाठी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानेही सतेज पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याचे सांगण्यात येते.































































