
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळा हा एक गंभीर विषय आहे. पार्थ पवार प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच चौकशी करून वास्तव समाजापुढे ठेवावे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज मांडली.
अकोला दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन घोटाळ्याबाबत प्रश्न केला. त्यावर शरद पवार म्हणाले, पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर असल्याचे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे.
अजित पवारांना जाणीवपूर्वक घेरण्याचा प्रयत्न होत आहे का? या प्रश्नावर आपल्याला हे सांगता येणार नसल्याचे शरद पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी या विषयात व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजकारणात कुटुंब नाही, तर विचारधारा महत्त्वाची
कुटुंबप्रमुख म्हणून या प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता असे पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, प्रशासन, राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो.
कुणालाही वाचविण्याचा प्रयत्न नाही
पार्थ पवार यांच्याशी संबंधित कोरेगाव पार्क भूखंड घोटाळ्यात नियमानुसार कारवाई केली जाईल. या प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे. भविष्यातही या गुह्याचा तपास सुरू असताना त्यात कुणाचा सहभाग आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल. याप्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी याप्रकरणी यापूर्वीच अगदी स्पष्टपणे कारण सांगितले आहे. हा एफआयआर आहे. एफआयआरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फर्मेशन रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील, जे व्हेंडर्स असतील व ज्यांनी मान्यता दिल्या असतील त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो. त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराइज्ड सिग्नेटरीज होते, ज्यांनी हा सर्व व्यवहार केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.





























































