डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, एके-47 आणि जिवंत काडतूस जप्त; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला

देशात सलग दुसऱ्या दिवशी घातपाताचा डाव उधळून लावण्यात आला. गुजरात एटीएसने रासायनिक हल्ल्याची तयारी करणाऱ्या ‘आयएस’च्या तीन दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता जम्मू-कश्मीर पोलिसांनी हरयाणामध्ये धडक कारवाई करत डॉक्टरच्या घरातून 300 किलो आरडीएक्स, एके-47 आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त केली आहेत.

अनंतनाग जिल्ह्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएसपी) औषध विभागाचे औषध तज्ज्ञ डॉ. आदिल अहमद राठर यांना गेल्या महिन्यात श्रीनगर पोलिसांनी सहारनपूर येथून अटक केली होती. जैश-ए-मोहम्मद या बंदा घातलेल्या दहशतवादी संघटनेचे पोस्टर्स लावल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

ऑक्टोबर 2024 पर्यंत तो जीएसपी येथे कार्यरत होता आणि त्यानंतर त्याची उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे बदली झाली होती. तत्पूर्वी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी महाविद्यालय परिसरात छापा टाकला आणि डॉ. राठर यांच्या लॉकरमधून एके-47 असॉल्ट रायफल आणि दारुगोळा जप्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी सुरू केली.

पोलीस चौकशीदरम्यान आणखी एका डॉक्टरचे नाव समोर आले. डॉ. मुजाहिल शकील असे त्यांचे नाव असून ते जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांनी फरिदाबाद येथील घरात हत्यारे आणि दारुगोळा लपवून ठेवल्याची माहिती उघड होताच पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घरातून पोलिसांनी 300 किलो आरडीएक्स, एके-47 रायफल, 84 जिवंत काडतूस आणि पाच लीटर केमिकल जप्त केले आहे.

आरडीएक्सचा वापर करून देशभरात दहशतवादी हल्ले करण्याचा डाव उधळून लावण्यात आला आहे. सध्या दोन्ही डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी काही मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

‘विषारी’ दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक