Pune news – हडपसर-शेवाळवाडी चौकात पेट्रोल-डिझेलच्या टँकरला आग, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

पुण्यात पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला सोमवारी सकाळी आग लागली. शेवाळवाडी चौकातील सिग्नलजवळ 9 वाजून 20 मिनिटांनी टँकरला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने वेळीच वाहन थांबवले आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने सतर्कता दाखवत चारही बाजूने पाण्याचा मारा करत आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला.

सोमवारी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी हडपरस-शेवाळवाडी चौकात पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. हडपसर, काळेपडल, बीटी कवडे रोड आणि खराडी अग्निशमन केंद्रातून पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. हा टँकर चौकात मधोमध उभा होता आणि टँकरच्या केबिनने पेट घेतला होता. टँकरमधून पेट्रोल-डिझेल असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता.

अग्निशमन दलाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चारही बाजूने पाण्याचा मारा केल्याने आग टँकरमधील पेट्रोल-डिझेलपर्यंत पोहोचली नाही. अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, निलेश लोणकर व वाहचालक नारायण जगताप, राजू शेख आणि तांडेल शौकत शेख तसेच फायरमन बाबा चव्हाण, चंद्रकांत नवले, रामदास लाड, अविनाश ढाकणे यांनी बचावकार्य केले.

दरम्यान, आग लागल्यानंतर चालक वेळीच बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. टँकरमध्ये एकूण 15000 लीटर डिझेल आणि 5000 लीटर पेट्रोल होते. हा पेट्रोल पुण्याहून लोणीच्या दिशेने निघाला होता.

“अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत जवानांनी दाखवलेली सतर्कता यामुळे मोठी हानी टळली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.”

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन दल, मनपा पुणे